प्रसारमाध्यमांचा भाजपाकडून चलाखीने वापर
By admin | Published: January 11, 2015 12:51 AM2015-01-11T00:51:47+5:302015-01-11T00:51:47+5:30
भारतीय जनता पक्षाला माध्यमांना चलाखीने हाताळण्याचे तंत्र अवगत असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले.
पुणे : माजी पंत्रप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाहीमुळे सर्वसामान्य जनतेने त्यांना पराभूत केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा हुकूमशहा बनले तर देशातील जनता त्यांना हरवेल. भारतीय जनता पक्षाला माध्यमांना चलाखीने हाताळण्याचे तंत्र अवगत असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले.
भारतीय छात्र संसदेमध्ये ‘माध्यमे : वास्तव की टीआरपीचा खेळ’ या विषयावर चर्चासत्रात राजदीप सरदेसाई बोलत होते. या चर्चासत्रात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. अब्दुल सलाम, उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्ष गोविंद सिंग कुंजवाल, फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी शर्मिला शेंडे आदींनी सहभाग घेताला. तेलंगणाचे आमदार के. पी. विवेकानंद यांना ‘युवा आमदार पुरस्कार’ देण्यात आला. सरदेसाई म्हणाले, ‘‘अलीकडे मोदींना प्रश्न विचारण्याचे सोडून काही पत्रकार त्यांच्याबरोबर सेल्फी काढून घेत आहेत. त्यामुळे पत्रकारितेला पब्लिक रिलेशनचे स्वरूप आल्याचे दिसून येते.’’ (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्यांकडे माध्यमांकडून दुर्लक्ष केले जाते. तर, सेलिब्रिटींच्या लहानसहान बातम्या वारंवार दाखविल्या जातात. कोणत्या बातम्या आम्हाला पाहायच्या आहेत, हे तरुणांनी तसेच सर्वसामान्य प्रेक्षकांनी माध्यमांना सांगण्याची वेळ आली आहे.
- राजदीप सरदेसाई, ज्येष्ठ पत्रकार