औरंगाबाद जिल्ह्यात साडेआठशे एकरवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 07:56 PM2016-07-22T19:56:49+5:302016-07-22T19:56:49+5:30
कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) च्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ८५० एकर शेतीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबविला जात आहे. जिल्ह्यातील
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) च्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ८५० एकर शेतीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबविला जात आहे. जिल्ह्यातील विविध भागांतील १७ शेतकरी गटांनी पुढे येऊन सेंद्रिय शेतीची नोंदणी केली आहे. या शेतीवर कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक न वापरता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने खरिपाचे पीक घेण्यात येत आहे.
केंद्र सरकारने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आत्माला प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेती करणारे गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २४ शेतकरी गटांचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामात त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ शेतकरी गट स्थापन होऊन त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली आहे. गंगापूर तालुक्यात कासोडा, खुलताबाद तालुक्यात वेरूळ, कन्नड तालुक्यात वाकद, आडगाव, कविटखेडा, सोयगाव तालुक्यात जरंडी, औरंगाबाद तालुक्यात पळशी आदी ठिकाणी हे गट स्थापन झाले आहेत. प्रत्येक गटात पन्नास शेतकरी असून, त्या सर्वांनी आत्मा कार्यालयात सेंद्रिय शेतीची नोंदणी केली आहे. आता खरिपाचे पीक निघाल्यानंतर आत्माकडून या शेतकऱ्यांना सेंद्रिय पिकांचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच त्यांचे उत्पादन विक्री करण्यासाठीही कृषी विभागाकडून मदत केली जाणार आहे. शेतीत रासायनिक खत किंवा कीटकनाशकाचा वापर करणार नसल्याची हमी शेतकऱ्यांनी दिली आहे. त्याऐवजी या शेतकऱ्यांना गांडूळ खत, जैविक खते वापराविषयीचे प्रशिक्षण कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील या साडेआठशे एकर शेतजमिनीवर प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, हरभरा यासारख्या कडधान्यांची पेरणी करण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने फळभाज्यांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ गट स्थापन झाले असून, आणखी ७ गटांची स्थापना केली जाणार आहे.
सेंद्रिय शेतीचे फायदे...
उत्पादन खर्चात बचत.
जमिनीचा पोत सुधारण्यास मदत.
उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा.
सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या मालाला अधिक भाव.
शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती अधिक फायद्याची आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या मालाची विक्री करण्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून मदत केली जाणार आहे.
- सतीश शिरडकर, उपसंचालक, आत्मा