बचाव कार्यासाठी स्कुबा डायव्हिंगचा वापर
By Admin | Published: February 29, 2016 03:34 AM2016-02-29T03:34:55+5:302016-02-29T03:34:55+5:30
गावात दोन लग्ने आणि क्रिकेटचे सामने होते. त्यामुळे गावात येण्यासाठी नागाव जेट्टीवर मोठी गर्दी होती. बोट उलटल्यानंतर सर्वांनीच मदतीसाठी धाव घेतल्याने मोठी जीवितहानी झाली
वसई : गावात दोन लग्ने आणि क्रिकेटचे सामने होते. त्यामुळे गावात येण्यासाठी नागाव जेट्टीवर मोठी गर्दी होती. बोट उलटल्यानंतर सर्वांनीच मदतीसाठी धाव घेतल्याने मोठी जीवितहानी झाली नाही. प्रवासी वाहतुकीचा परवाना नसलेल्या बोटीतून क्षमतेपेक्षा जास्त, ७०च्या आसपास प्रवासी भरले गेले होते. भरतीची वेळ, गढूळ पाणी आणि चिखल असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळा येत होता, पण गावकऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरळीत पार पडले. अग्निशमन दलाने स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून सर्च आॅपरेशन केले, तसेच घटनास्थळी ८ अॅम्ब्युलन्स ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले, अशी माहिती पालिका फायरब्रिगेडचे प्रमुख भरत गुप्ता यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार, डीवायएसपी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला हातभार लावला. आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, मदन किणी, शिवसेनेचे विवेक पाटील, काँग्रेस वसई शहर अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो, डॉमनिक डाबरे आदी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आणि हॉस्पिटलमध्ये मदतकार्यात सहभागी झाले होते. गरज पडली तर बाहेरचे डॉक्टर मागवा, असे आमदार ठाकूर हे प्रशासनाला सांगत होते.