महिलांच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर
By admin | Published: July 3, 2017 03:34 AM2017-07-03T03:34:07+5:302017-07-03T03:34:07+5:30
महिलांवर होणारे बलात्कार, विनयभंग, छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी असे दृश्य स्वरूपातील गुन्ह्यांसोबतच महिलांना
लक्ष्मण मोरे/ लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महिलांवर होणारे बलात्कार, विनयभंग, छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी असे दृश्य स्वरूपातील गुन्ह्यांसोबतच महिलांना आता ‘अदृश्य’ स्वरूपातील अत्याचारांचाही सामना करावा लागत आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर करून महिलांची बदनामी करण्याचे, तसेच त्यांचे चारित्र्यहनन करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. यामध्ये फेसबुक आणि अश्लील संकेतस्थळांचा सर्वाधिक वापर केला जात असून अनेक महिलांना यामुळे नैराश्य येऊ लागल्याचे चित्र आहे.
फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्कचा वापर करून महिला आणि तरुणींना टारगेट केले जात आहे. प्रेमभंग, शाळा-महाविद्यालयांमधील, कामाच्या ठिकाणी होणारे वाद यांमधून संबंधित महिलांचे बनावट प्रोफाईल तयार करून त्यावर मोबाइल क्रमांक टाकण्यात येत असल्याच्या घटना अधिक आहेत. मुली आणि महिलांच्या बदनामीमध्ये सर्वाधिक आरोपी हे ओळखीचे किंवा जवळचे मित्र असल्याचे सर्वेक्षणामधून पुढे आले आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे येणाऱ्या तक्रारींमधून बदनामीचा हा एक नवा टे्रंड समोर येऊ लागला आहे. आपला मोबाइल क्रमांक अथवा फोटो एखाद्या अश्लील वेबसाईटवर टाकला गेल्याची माहिती महिलांना नसते. मात्र, जेव्हा देशभरामधून अश्लील संभाषण करणारे दूरध्वनी येऊ लागतात, तेव्हा मात्र या महिलांना धक्का बसतो. अशा घटनांमुळे महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. अनेकींच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने घटस्फोटाची मागणी केल्याचीही उदाहरणे
आहेत.
एका महिलेचे ती काम करीत असलेल्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद झाले होते. या महिलेने त्याच कारणावरून नोकरी सोडली. मात्र, काही दिवसांतच तिला अश्लील संभाषण करणारे दूरध्वनी मोबाइलवर येऊ लागले. तिने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याचा शोध घेतला असता तिच्याच वरिष्ठाने महिलेचा मोबाइल क्रमांक एका अश्लील संकेतस्थळावर ‘कॉल गर्ल’चा क्रमांक म्हणून पोस्ट केला होता. त्यामुळे या महिलेच्या पतीने तिच्याकडे घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी त्याची समजूत काढल्यानंतर हे प्रकरण निवळले. अशी एक ना अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
केवळ प्रेमभंग, कामाच्या ठिकाणचे वाद यामुळेच असे प्रकार घडताहेत, असे नाही तर कौटुंबिक कलहामधूनही असे प्रकार घडू लागले आहेत. एका पतीने स्वत:च्याच पत्नीचे फेसबुकवर अश्लील प्रोफाईल तयार करून तिचा मोबाईल क्रमांक त्यावर टाकला होता. तपासामध्ये ही बाब समोर आली. एका पतीने पत्नीसोबतच्या शरीरसंबंधाची व्हिडीओ क्लिप तयार करून एका पॉर्नसाईटवर टाकल्याचेही प्रकरण समोर आले होते. एरवी ऐकायला किळसवाणी आणि पचायला अवघड असलेली ही उदाहरणे प्रत्यक्षातील
आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांवर मानसिक आघात करण्याचे एक अस्त्र विकृतांच्या हाती लागल्याचे चित्र आहे.
एका २५ वर्षीय तरुणीचे नुकतेच लग्न झाले होते. तिचा पती विदेशामध्ये नोकरी करतो. भारतामध्ये येऊन जाऊन असलेल्या तिच्या पतीने एक दिवस तिला फोन करून घटस्फोटाची मागणी केली. एका संकेतस्थळावर तिचे प्रोफाईल असून त्यावर अनेक अश्लील कमेंट आल्याचे त्याने सांगितले. ऐन गरोदरपणामध्ये तिला त्याने नांदवणार नाही, असे सांगितले. त्यातच ती बाळंत झाली, मात्र पती तिला पाहायलाही आला नाही. या तरुणीने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित संकेतस्थळ आणि त्याचा आयपी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, संकेतस्थळाकडून पोलिसांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी पोलिसांनी पतीचे समुपदेशन करून समजूत काढल्यावर त्यांच्यातील तणाव निवळला.
पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या मध्य प्रदेशातील तरुणीची ओळख त्याच राज्यातील एका तरुणासोबत झाली. दोघांची मैत्री प्रेमात बदलली. व्हॉट्सअॅपवर दोघांचे चॅटिंग सुरू झाले. त्याच्या आग्रहाखातर या तरुणीने स्वत:चे नको त्या अवस्थेतील फोटो त्याला व्हॉट्सअॅपवर पाठविले. या तरुणाने तिचे हे फोटो एका अश्लील संकेतस्थळावर टाकले. अनेकांनी हे फोटो डाऊनलोड केले. सोशल मीडियावरून फिरत फिरत हे फोटो तिच्या भावापर्यंत पोहोचले. भावाला त्यामुळे धक्का बसला. त्याने बहिणीकडे याबाबत विचारणा केली तेव्हा तिलाही धक्का बसला. तिने पोलिसांकडे तक्रार केली. संकेतस्थळावरून हे फोटो हटविण्यात आले. लिंक डीलिट करण्यात आली. बदनामी झाल्याने या तरुणीला शिक्षण अर्धवट सोडून मध्य प्रदेशात जावे लागले.
सोशल मीडिया
आणि इंटरनेटवर तयार केलेल्या बनावट प्रोफाईल, मोबाईल क्रमांक अथवा फोटोची लिंक शेअर केली, की ती आपोआप फिरत राहते. त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणावर बदनामी होते. अशा प्रकारच्या लिंक पती, भाऊ, वडील, बहिणी, सासरचे नातेवाईक, ओळखीचे यांच्याकडे गेल्यास महिलांना घरामधून बाहेर पडण्याचीही हिंमत होत
नाही.
एकाच भागात राहत असलेल्या तरुण-तरुणीचे आपसात प्रेम होते. त्यांच्यामध्ये झालेल्या शरीरसंबंधाचे तरुणाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. काही कारणास्तव त्यांचा ‘ब्रेक अप’ झाला. रागाच्या भरात या तरुणाने ही चित्रफीत एका पॉर्नसाईटवर पोस्ट केली. त्यावर संबंधित मुलीचा मोबाईल क्रमांकही दिला. या सर्व प्रकारामुळे तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
एका तरुणीने लग्न होऊन अवघे दोनच महिने झाले होते. तिचा पती आॅस्टे्रलियामध्ये राहण्यास आहे. अत्यंत उच्चभू्र आणि उच्चशिक्षित असलेले हे दाम्पत्य दोन महिन्यांतच वेगळे झाले. त्यानंतर पतीने आॅस्टे्रलियामधूनच पत्नीच्या नावाने चारित्र्यहनन करणारा मजकूर असलेली बातमी देशभरातील महत्त्वाच्या वर्तमानपत्रांच्या ई-पोर्टलला पाठविली. अनेक पोर्टलवरून कोणतीही शहानिशा न करता ही बातमी प्रसिद्ध झाली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोर्टल्सना नोटिसा पाठवल्या. अनेकांनी त्यानंतर ही लिंक आणि बातमी डीलिट करून टाकली.
सोशल मीडियावर बदनामी, अश्लील कमेंट करणे, अकाउंट हॅक करणे, अश्लील फोटो अथवा व्हिडीओ पोस्ट करणे, त्याचा खंडणीसाठी वापर करणे, बनावट अकाउंट काढणे, व्हॉट्सअॅपवर बदनामी करणे, मोबाईल क्रमांक टाकणे, यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करणे आदी प्रकारांनी महिलांची बदनामी करण्याचे सत्र सध्या सुरू आहे. अशा स्वरुपाच्या एकूण तक्रारींपैकी महिलांच्या तक्रारींचे प्रमाण ८० टक्के आहे.