राज्यात पुन्हा एकदा ‘उडान’चा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:15 AM2019-01-18T06:15:27+5:302019-01-18T06:15:41+5:30
१३ फेब्रुवारीपासून होणार सुरुवात : राज्यांतर्गत विमानसेवेसाठी स्पाइस जेट, टर्बाे मेगाची निवड
- गौरीशंकर घाळे
मुंबई : महानगरांपलिकडे विमानसेवेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने राज्यात पुन्हा ‘उडान’चा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यानुसार १३ फेब्रुवारीपासून नाशिक, जळगाव, कोल्हापूर आणि सोलापूर ही शहरे पुन्हा विमानसेवेने मुंबईशी जोडण्यात येणार आहेत. याशिवाय, नाशिक-पुणे दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठी स्पाइस जेट आणि टर्बाे मेगा या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील विविध जिल्हे विमानसेवेने जोडण्याचा यापूर्वी करण्यात आलेला प्रयत्न फसला होता. एअर डेक्कन कंपनीला ‘उडान’ प्रकल्पांतर्गत विमानसेवा देण्यात अपयश आले. त्यामुळे आता एअर डेक्कनच्या जागी स्पाइस जेट आणि टर्बाे मेगा या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यांत १३ फेब्रुवारीपासून नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे, जळगाव-मुंबई, कोल्हापूर-मुंबई आणि सोलापूर-मुंबई या पाच मार्गांवर पुन्हा विमानसेवेला सुरुवात होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पहिल्या टप्प्यातील विमानसेवा यशस्वी झाल्यानंतर दुसºया टप्प्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून अन्य राज्यात विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी १९ मार्गांना मंजुरी देण्यात आल्याचे संबंधित अधिकाºयांनी स्पष्ट केले. जळगाव-अहमदाबाद, कोल्हापूर-बंगळुरू, कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-तिरूपती, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-बेंगलोर, नाशिक-भोपाळ, नाशिक-गोवा, नाशिक-इंडन, नाशिक-हैदराबाद, सोलापूर-बंगळुरू, सोलापूर-हैदराबाद, मुंबई-दरभंगा, मुंबई-कन्नूर, मुंबई-अलाहाबाद, नागपूर-अलाहाबाद, पुणे-अलाहाबाद, पुणे-हुबळी या मार्गांवर विमानसेवा सुरू केली जाईल. १५ जूनपासून नाशिक-दिल्ली दरम्यान विमानसेवा सुरू होणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
काय आहे ‘उडान’ प्रकल्प
छोटी शहरे विमानसेवेने जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘उडान’ ही योजना जाहीर केली. ‘उडान’ प्रकल्पांतर्गत नवीन शहरात विमानसेवा देणाºया कंपनीला प्रत्येक फेरीतील ५० टक्के आसने सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी लागतात. प्रवाशांअभावी आसने रिक्त राहिल्यास केंद्र आणि राज्य सरकारांकडून अनुदान स्वरूपात विमान कंपनीचा तोटा भरून काढला जातो. देशांतर्गत विमानसेवा मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती आणि गोंदिया येथील विमानतळांचा विकास करण्यात आला आहे.