राज्यात पहिल्यांदाच वेबिनारचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:44 AM2017-12-02T05:44:38+5:302017-12-02T05:44:56+5:30
राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल’वर आधारित रस्ते बांधणीसाठी ‘उत्कर्ष महामार्ग’ ही योजना सुरू केली आहे.
मुंबई : राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल’वर आधारित रस्ते बांधणीसाठी ‘उत्कर्ष महामार्ग’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच ‘वेबिनार’ (लाइव्ह व्हिडीओ कॉन्फरन्स)चे आयोजन करण्यात आले. मंगळवार, ५ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील वेबिनारद्वारे एकाचवेळी जगभरातील २५० कंत्राटदारांशी संवाद साधणार आहेत.
हायब्रीड अॅन्युइटी पद्धतीने राज्यातील रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. राज्य शासन आणि कंत्राटदार संयुक्तपणे ही योजना राबवतील. या योजनेंतर्गत राज्यातील ३० हजार किमी रस्त्यांची बांधणी केली जाईल. पहिल्या टप्प्यात दोन वर्षांत १० हजार किमीचे रस्ते उभारण्यात येतील. त्यासाठी राज्य सरकार कंत्राटदारांना सुरुवातीला ६० टक्के आणि नंतरच्या १० वर्षांत ४० टक्के रक्कम देणार आहे.
या योजनेमुळे प्रकल्पाची किंमत व कालावधी यामध्ये खूप मोठा फरक पडेल. कंत्राटदारांना या योजनेची माहिती देण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येईल. वेबिनारमुळे रस्तेनिर्मितीच्या व्यवसायात असणारे जगभरातील २५० कंपन्यांचे प्रतिनिधी एकाचवेळी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बसून वेबिनारच्या माध्यमातून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधतील. वेबिनारच्या दरम्यान कंत्राटदारांना ‘उत्कर्ष महामार्ग’ या प्रकल्पाची माहिती, रस्त्यांचे आयुष्यमान, कंत्राटासाठी पात्रतेचे निकष आदी माहिती देण्यात येईल.