झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रयोग

By admin | Published: March 3, 2017 01:28 AM2017-03-03T01:28:21+5:302017-03-03T01:28:21+5:30

रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबरच माणसांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

Use of Zero Budget Natural Agriculture | झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रयोग

झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रयोग

Next

जयदीप हिरवे,
पेठ- रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबरच माणसांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी झिरो बजेट नैसर्गिकशेती हाच एकमेव पर्याय असल्याने पेठ येथील उमेश कंधारे या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रयोग करत लसूण या पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.
कंधारे यांनी सुमारे ४० गुंठे शेतीक्षेत्रात लसूण या पिकाच्या ४ गोण्यांची लागवड केली. या लसूण पिकामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा या पिकाचेदेखील यशस्वी उत्पादन त्यांनी घेतले. शेतात सऱ्या पाडून लसूण पिकाची लागवड करण्यात आली. दोन सऱ्यांमध्ये टोकण पद्धतीने हरभरा पीक घेतले. लसूण पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरण्यात आली. लसूण पिकाची लागवड, मजुरी व काढणीसाठी असा एकूण ४५ ते ५० हजार रुपये भांडवली खर्च आला. सुमारे साडेतीन महिन्यांतच लसूण काढणीस आला. लसणाच्या एका गोणीपाठीमागे १० गोण्या अशा एकूण ४० गोणी लसूण पिकाचे भरघोस उत्पादन निघाले.
शेतीतज्ज्ञ सुभाष पालेकर यांच्यापासून प्रेरणा घेत कंधारे यांनी आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे झिरो बजेट नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात केली. कंधारे यांनी सर्वप्रथम देशी गायींचे संगोपन करण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या गोठ्यात ५ देशी गायी आहेत. देशी गायीचे दूध व मलमूत्र आरोग्यवर्धक आहे. तसेच शेतामध्येही मलमूत्रापासून तयार केलेल्या जीवामृतच्या फवारण्या केल्या आहेत.
मोकळी हवा व चांगल्या सूर्यप्रकाशामुळे लसणाचे पीक जोमदार आले. त्यात ठिबकने पाणीपुरवठा असल्याने पिकाला गरजेपुरतेच पाणी मिळाले. देशी गाईचे मलमूत्र, शेण, गूळ व डाळीच्या पिठापासून तयार केलेले जीवामृत याचा वापर केल्याने पिकांच्या अंगात अधिक रोगप्रतिकारक शक्ती येते. याचबरोबर वेगवेगळे औषधी गुणधर्म असणाऱ्या १० झाडांचा पाला देशी गायीच्या गोमूत्रात कुजवून त्याचे दशपर्णी अर्क तयार करून त्याच्या तीन फवारण्या या लसूण पिकावर करण्यात आल्या. याचबरोबर जीवामृत एकदा पाण्याबरोबर सोडण्यात आले, एकदा पिकांवर शिंपडले व एकदा त्याची फवारणी करण्यात आली. सर्वांत शेवटी अंतिम टप्यात देशी गायीच्या ताकाची एकदा संपूर्ण पिकावर फवारणी केली असल्याचे कंधारे यांनी सांगितले.
>जमिनीची सुपीकता चांगली राहते
उमेश कंधारे या तरुण शेतकऱ्याने झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा अवलंब करत शेतीमध्ये त्यांनी स्वत:ला अक्षरक्ष: वाहून घेतले आहे. त्यांच्याकडे या नैसर्गिक शेतीचे कृषी पदवीधरापेक्षाही अधिक ज्ञान आहे.
सर्वांनीच या नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. जेणेकरून जमिनीच्या सुपीकतेबरोबरच मानवाचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असल्याचे कंधारे सांगतात.

Web Title: Use of Zero Budget Natural Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.