कोल्हापूरात कारवाई टाळण्यासाठी दिखाऊ हेल्मेटचा वापर
By admin | Published: June 20, 2017 08:46 PM2017-06-20T20:46:20+5:302017-06-20T20:46:20+5:30
विनाहेल्मेट दुुचाकी चालविणाऱ्यांविरोधात कोल्हापूरमध्ये पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतील पाचशे रुपयांचा दंड टाळण्यासाठी
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २0 : विनाहेल्मेट दुुचाकी चालविणाऱ्यांविरोधात कोल्हापूरमध्ये पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतील पाचशे रुपयांचा दंड टाळण्यासाठी वाहनधारकांकडून केवळ दिखाऊ स्वरूपातील हेल्मेटचा वापर सुरू आहे. त्यामुळे अशा स्वरूपातील हेल्मेट असूनही जीव धोक्यात घालून काहींचा प्रवास सुरू आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. यात त्यांनी महामार्गावर हेल्मेटचा वापर बंधनकारक केला आहे. जे वाहनधारक विना हेल्मेट असतील, त्यांना पाचशे रुपयांचा दंड करण्यात येत आहे. पोलिसांनी हेल्मेटबाबतची कारवाई कडक केली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या कारवाईतून वाचण्यासाठी अनेक दुचाकीधारकांकडून हेल्मेट खरेदीची धावपळ सुरू आहे. यांतील काहीजण सुरक्षित आणि चांगल्या दर्जाच्या हेल्मेटला प्राधान्य देत आहेत. मात्र, काही वाहनधारकांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या आणि आयएसआय मार्क नसलेल्या केवळ दिखाऊ स्वरूपातील हेल्मेटचा वापर केला जात आहे.
शहर आणि शहरालगतच्या महामार्गांवर ठिकठिकाणी अशा दिखाऊ हेल्मेटची विक्री सुरू आहे. यात हाफ अँड विथ ग्लास, कॅप आणि फुल या प्रकारात हेल्मेट उपलब्ध आहेत. यातील फुल हेल्मेट ही ३५० ते ४००, हाफ अँड विथ ग्लास हे ३५०, तर कॅपची किंमत २०० ते ३०० रुपये इतकी आहे. यातील बहुतांश हेल्मेट बघताच ती केवळ दिखाऊ असल्याचे स्पष्ट होते. यात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक घटकांचा समावेश नाही. हेल्मेटची मागणी, ग्राहकांची गरज आणि आर्थिक स्थिती लक्षात घेऊन विक्रेत्यांनी विविध स्वरूपांतील हेल्मेट बाजारपेठेत उपलब्ध करून दिली आहेत.
सध्या दिल्ली आणि चेन्नई येथून हेल्मेट विक्रीसाठी कोल्हापुरात येत आहेत. विनाहेल्मेट प्रवास करून दंड भरण्यापेक्षा तीनशे रुपयांपर्यंतचे अशा स्वरूपातील हेल्मेट घेण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे. मात्र, ते या पर्यायातून स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहेत.
सुरक्षितता तपासणे गरजेचे
एकीकडे हेल्मेटचा वापर बंधनकारक केला असताना वाहनधारक वापरत असलेली हेल्मेट खरेच सुरक्षित आहे का? याची तपासणी होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने यंत्रणा कार्यन्वित व्हावी. अन्यथा सुरक्षिततेऐवजी निव्वळ कारवाई, दंड टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करण्याला बळ देण्यासारखे आहे.
सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. केवळ दंडाच्या स्वरूपातील कारवाई टाळण्यासाठी सुरक्षित नसलेले हेल्मेट वापरणे म्हणजे एक प्रकारे स्वत:ची फसवणूक करण्यासह जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे दुचाकीचालकांनी सुरक्षिततेचे आवश्यक घटक आणि चांगल्या दर्जाची हेल्मेट वापरण्यास प्राधान्य द्यावे. - अशोक धुमाळ,पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा