मॅजिक पेनचा वापर करून १.६५ लाखांना फसवले
By Admin | Published: May 25, 2017 12:03 AM2017-05-25T00:03:30+5:302017-05-25T00:03:30+5:30
गृहकर्ज मंजूर करण्यासाठी एका व्यापाऱ्याला धनादेश लिहण्यासाठी मॅजीकपेन दिले. त्याच्याकडून धनादेश लिहून घेतला; मात्र
लोकमत न्यूजनेटवर्क
ठाणे : गृहकर्ज मंजूर करण्यासाठी एका व्यापाऱ्याला धनादेश लिहण्यासाठी मॅजीकपेन दिले. त्याच्याकडून धनादेश लिहून घेतला; मात्र त्यावरील ‘अकाऊंट पेई’ शब्द मिटवून ठाण्यातील त्रिकुटांने त्याच धनादेशाद्वारे रक्कम काढून त्याची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध चितळसर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.
हिरानंदानी मेडोजमध्ये राहणारे व्यापारी अशोक गोविंद मिश्रा यांना गृहकर्जाची गरज होती. त्या अनुषंगाने ते चौकशी करीत असताना एप्रिल महिन्यात अभिषेक कुमार नावाच्या आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्याचे साथीदार रोशनी मिश्रा आणि मोनिष पटेल यांनीही अशोक मिश्रा यांच्याशी संपर्क साधून त्यांना गृहकर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. गृहकर्जासाठी लागणारा खर्च म्हणून त्यांनी दोन धनादेश अशोक मिश्रा यांच्याकडून घेतले. धनादेश लिहिण्यासाठी त्यांनी मिश्रा यांना स्वत:चे पेन दिले. मिश्रा यांनी आरोपींच्या पेनने ठाणे जनता सहकारी बँकेचा धनादेश लिहून तो ‘अकाऊंट पेई’ (केवळ बँक खात्यातून वटविला जाणारा धनादेश) केला. आरोपींनी धनादेश लिहिण्यासाठी दिलेल्या पेनाची शाई थोड्या वेळाने आपोआप मिटते, हे मिश्रा यांना माहित नव्हते. मिश्रा यांच्या धनादेशांवरील शाई थोड्या वेळाने मिटली. त्यानंतर आरोपींनी एका धनादेशावर ७५ हजार तर दुसऱ्या धनादेशावर ९० हजार रुपयांची रक्कम टाकली. याशिवाय दोन्ही धनादेश ‘अकाऊंट पेई’ ऐवजी ‘बेअरर’ करत रक्कम लंपास केली.