उस्मानला नाकारली भेट
By admin | Published: July 29, 2015 02:03 AM2015-07-29T02:03:32+5:302015-07-29T02:03:32+5:30
कारागृह प्रशासनाने विशिष्ट कारणाचा हवाला देत मंगळवारी उस्मान मेमन आणि त्याच्या वकिलाला याकूब मेमनची भेट घेऊ देण्यास नकार दिला. मात्र भेट नाकारण्यामागील नेमके कारण
नागपूर : कारागृह प्रशासनाने विशिष्ट कारणाचा हवाला देत मंगळवारी उस्मान मेमन आणि त्याच्या वकिलाला याकूब मेमनची भेट घेऊ देण्यास नकार दिला. मात्र भेट नाकारण्यामागील नेमके कारण कळू शकले नाही.
याकूबला त्याचे नातेवाईक आणि वकिलांनी कारागृहात येऊन भेट घेण्यासाठी धावपळ चालवली आहे. मंगळवारी दुपारी ४.१५ला उस्मान मेमन याकूबची भेट घेण्यासाठी कारागृहात पोहोचला. त्याच्यासोबत अॅड. गेडामही कारागृहाच्या आत गेले. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा होते, त्याकडे प्रसारमाध्यमाचे लक्ष लागले होते. सायंकाळी ६.४५च्या सुमारास उस्मान आणि अॅड. गेडाम बाहेर आले. तेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा उस्मान याने याकूबची भेट झाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता तो निघून गेला.
तांत्रिक कारण - गेडाम
तीन तास कारागृहात असलेल्या उस्मानला कारागृह प्रशासनाने याकूबची भेट का घेऊ दिली नाही, ते जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने कारागृहाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून खुलासा होऊ शकला नाही. तर, अॅड. गेडाम यांनी ‘तांत्रिक कारणामुळे’ भेट नाकारल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.