गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया वैद्यकीय कसोटीत उत्तीर्ण
By admin | Published: May 28, 2017 01:00 AM2017-05-28T01:00:23+5:302017-05-28T01:00:23+5:30
पुण्यामध्ये झालेल्या दोन्हीही गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या यशस्वितेवर वैद्यकीयदृष्ट्यादेखील शिक्कामोर्तब झाले आहे. गर्भाशय प्रत्यारोपण केलेल्या महिला आणि त्यांना गर्भाशय
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यामध्ये झालेल्या दोन्हीही गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या यशस्वितेवर वैद्यकीयदृष्ट्यादेखील शिक्कामोर्तब झाले आहे. गर्भाशय प्रत्यारोपण केलेल्या महिला आणि त्यांना गर्भाशय दान करणाऱ्या त्यांच्या आईची प्रकृतीदेखील उत्तम आहे. या यशस्वितेमुळे देश व परदेशातील तब्बल ४२ महिलांना अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी नावनोंदणी केल्याची माहिती गॅलेक्सी केअर हॉस्पिटल्सचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी शनिवारी दिली.
पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये १८ मे रोजी सोलापुरातील २१ वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचे गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले. ही शस्त्रक्रिया सुमारे नऊ तास चालली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका २४ वर्षीय महिलेवरदेखील अशीच शस्त्रक्रिया झाली. गर्भाशय प्रत्यारोपणाची ही आशिया खंडातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचे रुग्णालयाने सांगितले.