उत्तम जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट! सस्पेन्स कायम, म्हणाले, "अंतिम निर्णय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:49 AM2024-04-17T10:49:06+5:302024-04-17T10:50:58+5:30
Lok Sabha Election 2024 : शरद पवार यांची भेट झाल्यानंतर उत्तम जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुणे : सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे वजनदार नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानतंर आता शरद पवार यांनी ही जागा जिंकण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत. या मतदारसंघातील दुसरे वजनदार नेते उत्तम जानकर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, मोहिते - पाटील आणि उत्तम जानकर हे पारंपरिक विरोधक. पण, आताच्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने एकत्र येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली.
या भेटीनंतर उत्तम जानकर यांनी अंतिम निर्णय १९ तारखेला होईल, असे म्हणत माढ्यातील सस्पेन्स कायम ठेवला आहे. शरद पवार यांची भेट झाल्यानंतर उत्तम जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उत्तम जानकर म्हणाले, "माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांची बैठक झाली. शरद पवारांची इच्छा होती की, मी आणि मोहिते यांनी एकत्र यावं. याबाबत येत्या २, ३ दिवसात दुसरी बैठक होईल. १९ तारखेला माळशिरस आमदारकीबद्दल चर्चा होईल."
शरद पवार यांच्यासोबत माढामधील लोकांनी काय केले पाहिजे, याबद्दल चर्चा झाली. आमच्या तालुक्यातील लोकांची इच्छा आहे की, शरद पवारांसोबत जावे. आम्ही एकत्र आलो तर मी माळशिरसचा आमदारकीचा उमेदवार असू शकतो. कार्यकर्त्यांची भावना १९ तारखेला अंतिम होईल. १९ तारखेला अंतिम निर्णय होईल, असे उत्तम जानकर यांनी सांगितले. याशिवाय, कार्यकर्त्यांमध्ये मतमांतर असू शकतं. मी कुठल्याही प्रवेश पक्षात करणार नाही. मी सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहे. जरी मी अजित पवार गटात असलो, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलो होतो, असेही उत्तम जानकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
याचबरोबर, धैर्यशील मोहिते म्हणाले, 'शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं आहे. १९ तारखेला मेळावा होईल आणि त्यातून निर्णय होईल. राजकीय वैर संपायला पाहिजे हीच भूमिका आहे. रामराजे महायुती सोबत आहेत, त्यांचे सर्व कुटुंब आमच्या सोबत आहेत. चांगल्या मताने निवडून येऊ'.
लोकसभेला मोहिते; विधानसभेला जानकर ?
माळशिरस विधानसभा मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीत उत्तम जानकर यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला. जानकर हे राष्ट्रवादीकडून लढले तर विरोधात भाजपाचे राम सातपुते होते. आता लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी मोहिते यांना साथ द्यायची तर विधानसभेला सहकार्य घ्यायचे, असे ठरू लागल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच जानकर यांनीही मतदारसंघात भाजपाविरोधात नैराश्याचे वातावरण आहे. आम्हाला मोहिते लांबचे नाहीत. मोहिते यांच्याबरोबर युती करा, याच तालुक्यात आमदार, खासदार असावा, ही भावना लोकांमध्ये बळावली, असे वक्तव्य केले आहे. यावरून जानकर यांची मोहितेंशी जवळीक वाढल्याचेच दिसून येत आहे.