वि. भा. देशपांडे यांचे निधन

By admin | Published: March 10, 2017 12:51 AM2017-03-10T00:51:42+5:302017-03-10T00:51:42+5:30

मराठी रंगभूमीचा चालता बोलता कोश असलेले ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. विश्वनाथ भालचंद्र देशपांडे तथा वि.भा. देशपांडे (वय ७८) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

V. Bh Deshpande passes away | वि. भा. देशपांडे यांचे निधन

वि. भा. देशपांडे यांचे निधन

Next

पुणे : मराठी रंगभूमीचा चालता बोलता कोश असलेले ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. विश्वनाथ भालचंद्र देशपांडे तथा वि.भा. देशपांडे (वय ७८) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात कन्या विशाखा, जावई व नातू असा परिवार आहे.
वि.भा.देशपांडे यांचे पार्थिव दर्शनासाठी आधी एरंडवणा परिसरातील राहत्या घरी, त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेत ठेवण्यात आले होते. तेथे मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. कोणतेही धार्मिक विधी न करता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, गायक रघुनंदन पणशीकर, आदी उपस्थित होते.
डॉ. देशपांडे पाच दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक, विशेषत: नाट्यक्षेत्रात कार्यरत होते.मराठी नाट्यकोश या सुमारे १२०० पानी ग्रंथांचे लिखाण व संपादन करुन मराठी वाड.मयात त्यांनी मोलाची भर टाकली. वि.भा. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष होते. २००६ मध्ये निवडून आलेल्या परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये ते प्रमुख कार्यवाह होते. कार्याध्यक्ष गं. ना. जोगळेकर यांच्या निधनानंतर कार्याध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली. पुण्यात २०१० मध्ये झालेल्या ८३व्या साहित्य संमेलनातून शिल्लक राहिलेला ८२ लाख रुपयांचा निधी साहित्य परिषदेला मिळवून देण्यात त्यांचा प्रमुख हातभार होता. (प्रतिनिधी)

‘लोकमत’मध्येही नियमीत लिखाण
वि. भा. देशपांडे यांचा जन्म ३१ मे १९३८ रोजी पुण्यामध्ये झाला. नूतन मराठी विद्यालय व स. प. महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. ते मराठी आणि नाट्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. मॉडर्न महाविद्यालयात त्यांनी ३५ वर्षे अध्यापनाचे काम केले. ‘मराठी ऐतिहासिक नाटक’ या विषयावर त्यांनी पी.एचडी केली. त्यांचे स्वतंत्र व संपादित असे सुमारे ५० ग्रंथ प्रसिद्ध असून विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. ‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’, ‘निळू फुले’, ‘नाट्यभ्रमणगाथा’, ‘निवडक नाट्यप्रवेश : पौराणिक’, ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, भीमसेन जोशी, कमलाकर सारंग अशा अनेक मंडळींशी त्यांचे मैत्र जुळले होते. ‘लोकमत’मध्येही ते नियमीत लिखाण करीत होते.

Web Title: V. Bh Deshpande passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.