रंगला २ नगरसेवकांत ‘वि’ संवाद
By admin | Published: July 13, 2017 12:58 AM2017-07-13T00:58:50+5:302017-07-13T00:58:50+5:30
तळजाई पठारावर रस्त्यावर जॉगिंग पार्क व अन्य काही कामांबाबत राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तळजाई पठारावर रस्त्यावर जॉगिंग पार्क व अन्य काही कामांबाबत राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. या अनुभवसंपन्न नगरसेवकाच्या राजकीय वजनामुळे विविध विभागांचे अधिकारी वेळेवर उपस्थित झाले. अतिरिक्त आयुक्त शितल उगले व अन्य अधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता.
त्याचवेळी दुसऱ्या अनुभवी नगरसेविकाही यावेळी तिथे कामांच्या चर्चेसाठी म्हणूनच आल्या. त्यांनीही या भागातील विकास कामांबाबत बोलण्यास सुरूवात केली. अधिकाऱ्यांना बोलावले आपण व चर्चा दुसऱ्यांबरोबर. यामुळे पहिल्या नगरसेवकाचे पित्त खवळले. त्यांनी मध्येच आपले बोलणे सुरू केले. विषय सांगण्यास सुरुवात केली. त्यावर तुम्ही मध्येच का बोललात, म्हणून त्यांच्यावर त्या नगरसेविकेकडून शब्दांची बरसात सुरू झाली. शब्दाला शब्द वाढतच गेला, त्याचबरोबर दोघांचे आवाजही वाढले.
उपस्थित काही अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे त्यांनाच कोण कधी कसे निवडून आले, कोण मोठा, कोण लहान असे ऐकून घ्यावे लागले. अखेर हे काही थांबत नाहीत हे पाहून उगले यांनी तिथून निघून जाणे पसंत केले. त्या गेल्यावर बाकीचे अधिकारीही गेले व हा ‘वि’संवाद थंडावला.