वैद्यकीय प्रवेशाची घडी ‘नीट’ बसेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:20 AM2017-07-29T05:20:28+5:302017-07-29T05:20:38+5:30
डोमिसाईल घोटाळा आणि त्यानंतर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेतून घेतलेली माघार यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे.
मुंबई : डोमिसाईल घोटाळा आणि त्यानंतर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेतून घेतलेली माघार यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. या महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेतून माघार घेतल्याने दीड ते दोन हजार जागा कमी झाल्या आहेत. एकंदरच वैद्यकीय प्रवेशाची घडी ‘नीट’ बसत नसल्याचे चित्र आहे. या सर्व गदारोळात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने गुरुवारी मध्यरात्री वैद्यकीय प्रक्रियेची पहिली यादी दोन दिवस उशिरा जाहीर केली आहे. पहिल्या यादीत २ हजार ६७४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.
देशपातळीवर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशात सुसूत्रता आणण्यासाठी ‘नीट’ परीक्षा घेण्यात आली. त्यातही गोंधळ उडाला होता. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ५ हजार जागा असल्याने अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनी खोटी डोमिसाईल सर्टिफिकेट देऊन महाराष्ट्रातून अर्ज भरले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यादीमधून तब्बल ७६७ विद्यार्थ्यांची नावे काढून टाकण्यात आली होती. तसेच प्रवेशाची पहिली यादी दोन दिवस पुढे ढकलण्यात आली.
त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री दोन दिवस उशिराने जाहीर झालेल्या यादीमुळे पालक, विद्यार्थ्यांची चिंता मिटण्याऐवजी ती आणखीनच वाढली आहे. कारण पहिल्या यादीत २ हजार ६७४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असले तरी हे प्रवेश फक्त शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयातच देण्यात आले आहेत. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे यात नावच नाही. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेतून माघार घेतल्यामुळे प्रवेशाच्या दीड ते दोन हजार जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे संतप्त पालकांनी शुक्रवारी सकाळपासून संचालनालयाच्या कार्यालयात गर्दी केली होती. दुसरीकडे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना शुल्क नियंत्रण समितीने दिलेल्या शुल्कावर प्रवेश देणे शक्य नसल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विनाअनुदानित खासगी वैद्यकीय महाविद्यालयांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. खासगी महाविद्यालयांचा प्रश्न शनिवारपर्यंत सुटेल, तेदेखील प्रक्रियेत सहभागी होतील. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
सरकारने लक्ष घालावे
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ८५ टक्के जागा राखीव आहेत. पण, खासगी महाविद्यालयांनी प्रवेश नाकारल्यास राज्यातील विद्यार्थ्यांना अडचणी येणार आहेत. सातत्याने प्रवेश प्रक्रियेत होत असणाºया गोंधळामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागल्याने सरकारने यात लक्ष घालावे,अशी मागणी विद्यार्थी आणि पालक करत आहेत.