वाखरीत भक्तीत न्हाला वैष्णवमेळा; रिंगणांची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:16 AM2019-07-11T06:16:51+5:302019-07-11T06:16:57+5:30
शहाजी फुरडे-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क पंढरपूर : टिपेला पोहोचलेला टाळमृदंगाचा गजर,अश्वांची दौड, भाविकांचा कल्लोळ अन् वरुणराजाच्या अभिषेकाने बाजीरावच्या ...
शहाजी फुरडे-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : टिपेला पोहोचलेला टाळमृदंगाचा गजर,अश्वांची दौड, भाविकांचा कल्लोळ अन् वरुणराजाच्या अभिषेकाने बाजीरावच्या विहीजवळच्या रिंगणात वैष्णवांचा अवघा सोहळा भक्तीत चिंब झाला. पंढरपूरपासून अवघ्या दोन कोसावर वाखरीत रात्री संतमेळा दाखल झाला असून उद्या गुरूवारी हा मेळा पंढरपुरात दाखल होणार आहे. पालखी मार्गावर बुधवारी बाजीरावच्या विहिरीजवळ संत सोपानकाका, संत ज्ञानेश्वर महाराज अािण संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील गोल व उभी रिंगणे रंगल्याने वैष्णवांसह भक्तांना मेजवानी पहायला मिळाली.
पालखी मार्गाने आज संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका यांच्यासह इतर पालख्यांची वाटचाल सुरू होती. बाजीरावच्या विहीरजवळ दुपारी चारच्या सुमारास रस्त्यावरच अगोदर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे उभे रिंगण झाले. आणि नाचत नाचत दिंड्या व अश्व बाजुच्या शेतात गोल रिंगणासाठी सज्ज झाले.
शेवटच्या गोल रिंगणासाठी शेतात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विजेच्या चपळाईने तीन फेऱ्या मारून अश्वांनी अवघ्या सोहळ्यात चैतन्य फुलविले. हा सोहळा रात्री वाखरी येथे मुक्कामी गेला. वाखरीत रात्री मंगळवेढ्याहून दामाजी पंतांचीही पालखी दाखल झाली.
उद्या, शुक्रवार सर्व संतांच्या पालख्या मिळून पंढरीत दाखल होणार आहेत. सर्वात पुढे संत सोपानकाका, त्यामागे संत तुकाराम महाराज आणि सर्वात शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरीतून निघेल. मार्गात इसबावी येथे संत एकनाथ महाराज व संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत दामाजी पंत, संत नामदेव यांच्या पालख्या सामील होतील. आणि हा संतमेळा रात्री पंढरपुरात मुक्कामी जाईल. तत्पूर्वी विसाव्याजवळ विविध पालख्यांची उभी रिंगणे होणार आहेत.
तीर्थक्षेत्राच्या लेखी मंगळवेढा संतभूमीची गणनाच नाही
बाळासाहेब बोचरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संतांची जन्मभूमी असलेल्या मंगळवेढ्याला शासनाने अद्याप तीर्थक्षेत्राचा दर्जाच न दिल्याने संतांची मंगळवेढे भूमी विकासापासून दूरच राहिली आहे.
दुष्काळामध्ये शासनाचे गोदाम रिकामे करुन उपाशी जनतेला धान्य वाटणारे संत दामाजी पंत, अनेक अभंगाची रचना करुन भक्तीभाव जागृत ठेवणारे संत चोखामेळा आणि संत कान्होपात्रा या संतांची मंदिरे मंगळवेढा नगरीत आहेत. श्री स्वामी समर्थानीही या नगरीत काही वर्षे घालवली. लिंगायत धर्माचे महात्मा बसवेश्वर, संत सीतराम महाराज खर्डीकर, संत बंका, श्री संत गोविंदबुवा, संत गाडगेबाबा अशा १७ संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. पंढरपूरपासून अवघ्या २० किमीवर हे क्षेत्र आहे.
दामाजी पंतांनी संभाळलेला निजामाचा किल्ला आजही बकाल अवस्थेत आहे. देशात पुष्कर आणि मंगळवेढा या ठिकाणीच ब्रह्मदेवाच्या मूर्ती आहेत. मंगळवेढ्याची मूर्ती महादेवाच्या विहिरीत पडलेली आहे. महात्मा बसवेश्वराच्या स्मारकासाठी ५० कोटींची घोषणा केली पण झाले काहीच नाही.