पहिल्या कॅप राऊंडनंतर एमबीबीएसच्या ३९० जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:37 AM2019-07-13T05:37:26+5:302019-07-13T05:37:32+5:30
वैद्यकीय पदवी प्रवेश : बीडीएसच्या ३५९ जागा पहिल्या अलॉटमेंटनंतर शिल्ल्क
मुबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेशाच्या पहिल्या कॅप राऊंडनंतर सीईटी सेलकडून रिक्त जागांची संख्या जाहीर करण्यात आली. यामध्ये एमबीबीएसच्या ३९० तर बीडीएसच्या ३५९ जागा शिल्लक आहेत.
पहिल्या कॅप राउंडमध्ये एमबीबीएसच्या ५,१८४ जागा तर बीडीएसच्या २,२०८ जागा अलॉट करण्यात आल्या आहेत. नीटच्या निकालानंतर शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या सद्यस्थितीत असलेल्या जागा लक्षात घेता वैद्यकीय पदवी प्रवेशात यंदा ‘काँटे की टक्कर’ होणार हे आधीच स्पष्ट झाले होते.
सीईटी सेलकडून राज्यातील मेडिकल महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या सुधारित वेळापत्रकानुसार राज्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. यामध्ये तब्ब्ल ४३ हजार ३८६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यानंतर ७ ते ११ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पसंतीक्रम निवडायाचे होते. त्यानंतर शुक्रवारी, पहिली प्रवेशाची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एमबीबीबीएस आणि बीडीएसच्या जागा अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी १९ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच १ आॅगस्टपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे, असे सीईटी सेलने जाहीर केले आहे.
एमबीबीएस आणि बीडीएसच्या जागा
च्राज्यात एमबीबीएसच्या एकूण ५,५७४ जागा असून त्यातील ३,४५४ जागा शासकीय तर २,१२० जागा खाजगी महाविद्यालयात आहेत. तर बीडीएसच्या एकूण २,५६७ जागा असून त्यातील २१७ शासकीय आणि २,३५० जागा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांतील आहेत.
च्यामधील ३,३६० शासकीय तर १,८२४ जागा खाजगी महाविद्यालयांतील जागा प्रवेशासाठी पहिल्या कॅप राउंडला अलॉट करण्यात आल्या आहेत. बीडीएस प्रवेशासाठी अलॉट जागांमध्ये २०७ शासकीय तर २,००१ खाजगी जागांचा समावेश आहे.