रिकाम्या खुर्च्या अन् पुणेकर!
By Admin | Published: February 19, 2017 03:23 AM2017-02-19T03:23:25+5:302017-02-19T03:23:25+5:30
महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शनिवारी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात प्रचारसभा आयोजित केली होती. मात्र, मुख्यमंत्री सभास्थानी पोहोचून पाऊन
- मुख्यमंत्री सभा सोडून परतले
पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शनिवारी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात प्रचारसभा आयोजित केली होती. मात्र, मुख्यमंत्री सभास्थानी पोहोचून पाऊन तास वाट पाहिल्यानंतरही सभेला अपेक्षित गर्दी न झाल्याने, त्यांनी भाषण न करताच पिंपरीकडे प्रस्थान केले. दुपारी १ ते ४ ही पुणेकरांची विश्रांतीची वेळ असते, त्यामुळे ते कुठेच जात नाहीत. मग सभेला उपस्थित राहतील, ते पुणेकर कसले? असे संदेश दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते.
व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, खा. अनिल शिरोळे, आ. विजय काळे व शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. नियोजित वेळेनुसार फडणवीस सभास्थानी पोहोचले. मात्र, बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे फडणवीस हे गाडीतच बसून राहिले. काही वेळात गर्दी जमा होईल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, पाऊण तास वाट पाहिल्यानंतरही सभेला गर्दी जमण्याची चिन्हे दिसेना, त्यामुळे त्यांनी भाषण न करताच परतण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)
मिस कम्युनिकेशन
सभेच्या ठिकाणाहून पिंपरीतील सभेकडे जात असताना, ‘मिस कम्युनिकेशन’मुळे पुण्यातील सभेत भाषण करू शकत नसल्याचे ट्विट फडणवीस यांनी केले. तर मुख्यमंत्र्यांना पुढे पिंपरी व नाशिकमध्ये सभा घ्यायच्या होत्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी लँडिंग करणे शक्य नसल्यामुळे त्यांना लवकर निघावे लागले, असे बापट यांनी सांगितले.