सुट्टीमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल, अनधिकृत तिकीट एजंटांची चांदी
By admin | Published: April 16, 2017 07:42 PM2017-04-16T19:42:19+5:302017-04-16T19:42:19+5:30
उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल आहेत.
ऑनलाइन लोकमत
मिरज, दि. 16 - उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची मेअखेर आरक्षित तिकिटे संपली असून, प्रतीक्षा यादी चारशेवर पोहोचली आहे. आरक्षित तिकिटांना मोठी मागणी असल्याने अनधिकृत तिकीट एजंटांची चांदी झाली आहे. आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एजंटांच्या तिकीट खिडकीवर रांगा आहेत. उन्हाळी सुट्टीत रेल्वे प्रवासाला गर्दी असल्याने आरक्षित तिकिटांना मोठी मागणी आहे. मिरजेतून सुटणाऱ्या निजामुद्दीन, अजमेर, जोधपूर, तिरुपती, बेंगलोर, एर्नाकुलम, तिरुनेलवेल्ली, चंदीगड, नागपूर, अहमदाबाद या सर्वच दररोज व साप्ताहिक एक्स्प्रेस मेअखेर फुल्ल आहेत.
निजामुद्दीन, अजमेर, जोधपूर यांसारख्या रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी चारशेपेक्षा जास्त आहे. यामुळे तात्काळ तिकिटे मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू आहे. रेल्वे तिकीट खिडकीवर विक्री सुरू झाल्यानंतर किमान अर्धा तास मिळणारी तात्काळ तिकिटे आता केवळ पाचच मिनिटांत संपत आहेत. गोवा-निजामुद्दीन, बेंगलोर-अजमेर, बेंगलोर-जोधपूर या प्रीमियम दर्जाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या आरक्षित तिकिटांसाठी पहिल्या पाच मिनिटांनंतर वाढत जाणाऱ्या प्रीमियम दराने दुप्पट ते चौपट पैसे मोजावे लागतात.
आरक्षित तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर केवळ पाच मिनिटांत प्रीमियम दराने तिकीट विक्री सुरू होत असल्याने तिकीट खिडकीवर पहिला आणि दुसरा क्रमांक मिळविण्यासाठी रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर रात्रभर एजंटांच्या रांगा आहेत. यामुळे सामान्यांना आरक्षित व तात्काळ तिकिटे मिळणे अशक्य ठरले आहे. आरक्षित तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी ओळखपत्राची सक्ती, वातानुकूलित दर्जा, तात्काळ व आरक्षित तिकीट विक्रीसाठी स्वतंत्र वेळ, अशा उपाययोजना रेल्वे प्रशासनाने केल्या आहेत. मात्र मिरजेत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने तिकीट खिडकीवर एजंटांचा कब्जा असल्याचे दररोज सीसीटीव्हीत चित्रण होत आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार जोमात सुरू असताना रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांचे दुर्लक्ष आहे. अनधिकृत तिकीट एजंट आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून वेगवेगळ्या नावाने ई-तिकिटे काढत आहेत. ई-तिकिटांसाठीही सामान्य प्रवासी अद्यापही एजंटांवर अवलंबून आहेत.