सुट्या, लग्नसराई, सहलींमुळे जेजुरीला यात्रेचे स्वरूप
By admin | Published: December 26, 2016 02:42 AM2016-12-26T02:42:20+5:302016-12-26T02:42:20+5:30
नाताळ आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने तीर्थक्षेत्र जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी होती.
जेजुरी : नाताळ आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने तीर्थक्षेत्र जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी होती. लाखांवर भाविकांनी रांगा लावून कुलदैवताचे दर्शन घेतले. सुटीचा दिवस आणि खंडोबाचा वार असल्याने जेजुरीला यात्रेचे स्वरूप आले होते.
यातच पुणे-मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी मतदारांना सहल घडवल्याने सुमारे दीडशे बस जेजुरीत आल्याने भाविकांबरोबर वाहनांचीही मोठी गर्दी झाली होती. यामुळे संपूर्ण दिवसभर वाहतूककोंडी झाली होती. गडावर सदानंदाचा यळकोट यळकोट जय मल्हारच्या घोषणात भंडारा अन् खोबऱ्याची मुक्तहस्ते उधळण होत होती.
आज रविवार आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली होती. त्यात लग्नसराई असल्याने नवविवाहित जोडप्यांची संख्या मोठी होती. पुणे, सातारा, सोलापूर, मुंबई आदी परिसरातील भाविकांनी जेजुरीत मोठी गर्दी केली होती.
सर्वच मार्गावरून जेजुरीकडे दुचाकी, चारचाकी वाहने येत होती. यामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर दोन दोन किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती. यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला होता. मोठी गर्दी असल्याने तीर्थक्षेत्राला आज यात्रेचे स्वरूप आले होते. गडावरही भाविकांची मोठी गर्दी होती. भाविक रांगा लावून देवदर्शन घेत होते.
इच्छुकांची सहल : पुणे, मुंबई महानगरपालिकांच्या लवकरच निवडणुका होत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथील इच्छुकांनी मतदारांना सहली घडवण्याचा सपाटा लावलेला आहे. सेना आणि मनसेच्या इच्छुकांच्या सुमारे दीडशे बस जेजुरीत आल्याने वाहनांची ही मोठी गर्दी होती.
नवविवाहित जोडप्यांची संख्या मोठी
यात नवविवाहित जोडप्यांची संख्या मोठी होती. नवीन आयुष्याला सुरुवात करण्यासाठी ही जोडपी जेजुरीत मोठ्या उत्साहात येत होती. नववधूला उचलून गडाच्या पाच तरी पायऱ्या चढण्याची प्रथा आहे. गडाच्या पायरी मार्गावर ठिकठिकाणी हे दृश्य पाहावयास मिळत होते. लग्नानंतर सर्वप्रथम कुलदैवताचे दर्शन घेऊन कुलधर्म कुलाचाराचे धार्मिक विधी करताना दिसत होती. येथील ऐतिहासिक चिंचबाग परिसरातही मोठी गर्दी होती.
रांजणगावला भाविकांची गर्दी
रांजणगाव गणपती : मलांना सुट्या व वर्षअखेरचे औचित्य साधून आयोजिलेल्या कौटुंबिक सहलीमुळे येथील श्री अष्टविनायक क्षेत्र
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
दररोज हजारो भाविक महागणपतीचे दर्शन घेत आहेत. देवस्थान ट्रस्ट दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्यावर भर देत असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर व उपाध्यक्ष डॉ. संतोष दुंडे यांनी सांगितले.
गेल्या २ ते ३ दिवसांपासून भाविकांचा ओघ वाढला असून तो नवीन वर्ष आंरभापर्यंत राहील, असे मुख्य विश्वस्त राजेंद्र
देव यांनी सांगितले.
देवस्थानच्या वतीने प्रशस्त वाहनतळ, आच्छादित मंडप,
मोफत अन्नप्रसाद, स्वच्छ व थंडगार पाणी, अल्प दरात मोदकप्रसाद विक्री, दर्शन पास आदी सोयी-सुविधा पुरविल्याने भाविकांना
कमी वेळेत व सुलभरीतीने श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेता येतो, असे देवस्थानचे सचिव अॅड. विजय दरेकर व खजिनदार विजय देव यांनी सांगितले. पोलीस हवालदार व्ही. आर. कुंभार स्वत: सुरक्षारक्षक व स्वयंसेवकांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण ठेवून आहेत.