३०० गाढवांचे लसीकरण; धर्मा डाँकी सॅच्युअरी संस्थेचा १७ वर्षांपासून उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 06:08 AM2018-07-07T06:08:58+5:302018-07-07T06:08:58+5:30

सगरोळी येथील धर्मा डाँकी सँच्युअरी संस्थेतर्फे बुधवारी परिसरातील जवळपास ३०० गाढवांचे लसीकरण, निर्जंतुकीकरण व इतर उपचार करण्यात आले.

Vaccination of 300 donkeys; Dharma Danki Sanctuary has been organizing for 17 years | ३०० गाढवांचे लसीकरण; धर्मा डाँकी सॅच्युअरी संस्थेचा १७ वर्षांपासून उपक्रम

३०० गाढवांचे लसीकरण; धर्मा डाँकी सॅच्युअरी संस्थेचा १७ वर्षांपासून उपक्रम

Next

बिलोली (जि. नांदेड) : सगरोळी येथील धर्मा डाँकी सँच्युअरी संस्थेतर्फे बुधवारी परिसरातील जवळपास ३०० गाढवांचे लसीकरण, निर्जंतुकीकरण व इतर उपचार करण्यात आले.
सर्वात कष्टाळू व प्रामाणिक, परंतु दुर्लक्षित अशा गाढव या प्राण्यासाठी सगरोळी येथील धर्मा डाँकी सँच्युअरी ही संस्था मागील १७ वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे. २००० मध्ये तत्कालिन केंद्रीयमंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते या प्राणी उपक्रमाची सुरुवात झाली. नांदेड शहरासह बिलोली, नायगाव, धर्माबाद, देगलूर, कंधार, मुखेड या तालुक्यांत गाढवांची संख्या जवळपास साडेपाच हजार आहे. शेतकऱ्यांना शेताच्या बांधापर्यंत खत, औषधी पोहोचविणे ते शेतातील माल घरापर्यंत आणण्यासाठी तसेच बांधकामासाठी लागणारे रेती, मुरूम, दगड वाहतुकीसाठी गाढवाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या प्राण्यांना सर्रा, धनुर्वात, पोटसूळ असे अनेक आजार मोठ्या प्रमाणात जडतात. पशुपालक गाय, बैल, म्हैस या प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु, गाढव या प्राण्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. यासाठी धर्मा डॉकी सँच्युअरी ही संस्था गाढवांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. बुधवारी सगरोळी परिसरातील सहा गावांतील गाढवांसाठी तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सगरोळीसह हिप्परगा, दौर, आरळी, कौठा, वन्नाळी, सावळी गावांतील गाढव पालकांनी जवळपास ३०० गाढव आणले होते. यावेळी धनुर्वात, रोगप्रतिबंधक लसीकरण, जंतनाशक औषधी पाजवून निजंर्तुकीकरण करण्यात आले. तसेच जखमा, डोळे, लंगडणे, अशक्त, त्वचारोग, पोटसूळ इत्यादी आजारांवर उपचार करण्यात आले.

धनुर्वात, पोटसूळ आजार मोठ्या प्रमाणात
या प्राण्यांमध्ये मुख्यत: धनुर्वात व पोटसूळ हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. याकरिता धनुर्वात प्रतिबंधात्मक लस व निर्जंतुकीकरणाचे औषध पाजणे हा उपचार नियमित करणे गरजेचे आहे.
- प्रमोद देशमुख, अध्यक्ष, धर्मा डाँकी सँच्युअरी, सगरोळी

गाढवांची काम करण्याची क्षमता वाढली
मागील १७ वर्षांपासून आमच्या भागातील गाढवांच्या आरोग्याची काळजी या संस्थेमार्फत घेतली जात आहे. सहज उपचार मिळत असल्याने गाढव सुदृढ झाले आहेत. यामुळे गाढवांची काम करण्याची क्षमता वाढल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे
- डॉ. भूषण सदर, विषय विशेषज्ञ, पशुवैद्यकशास्त्र, कृषीविज्ञान केंद्र, सगरोळी.

Web Title: Vaccination of 300 donkeys; Dharma Danki Sanctuary has been organizing for 17 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.