Corona Vaccination: महाराष्ट्रातून देशाला मिळाली आनंदाची बातमी; लहान मुलांवरील कोरोना लस चाचणीचे सकारात्मक संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 04:40 PM2021-06-16T16:40:08+5:302021-06-16T16:41:15+5:30
६ जूनला ४० स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. क्लिनिकल ट्रायलमध्ये लहान मुलांना लसीचे डोस देण्याबाबत लवकरच निष्कर्ष काढला जाईल असं प्रमुख म्हणाले.
नागपूर – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता येणारी तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी याआधी दिला आहे. कोरोनापासून बचावासाठी देशात २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्यात येणार आहे. परंतु लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र लहान मुलांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता त्याचा प्रभाव रोखण्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
नागपूर सेंटर लसीकरण ट्रायलमध्ये भाग घेणाऱ्या लहान मुलांवर १ आठवड्यानंतरही कोणतेही साईड इफेक्ट दिसले नाहीत. त्यामुळे मुलांना लस दिल्यानंतरचा पहिला आठवडा यशस्वी ठरला आहे. पहिल्या आठवड्यात ना कोणत्या मुलाला ताप आणि ना कोणाला लसीमुळे कोणतीही समस्या उद्भवली आहे. ६ जूनला ४० स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. क्लिनिकल ट्रायलमध्ये लहान मुलांना लसीचे डोस देण्याबाबत लवकरच निष्कर्ष काढला जाईल असं प्रमुख म्हणाले.
AIIMS चे मेडिसिन विभागाचे डॉ. संजीव सिन्हा म्हणाले की, जुलैच्या अखेरपर्यंत आपल्याकडे अनेक लसी उपलब्ध होतील. लहान मुलांवर सुरु असलेल्या ट्रायलचे निकाल पुढील ३-४ महिन्यात येतील. हे निकाल सकारात्मक राहिले तर लवकरच लहान मुलांनाही कोरोनाची लस उपलब्ध होईल. पुढील ५-६ महिने भारताच्या दृष्टीने लसीकरण महत्त्वाचे आहे. मंगळवारपासून एम्समध्ये ६-१२ वयोगटातील कोव्हॅक्सिन चाचणीसाठी नामांकन सुरू करण्यात आलं आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताची कोव्हॅक्सिन लस ६ ते १२ वयोगटातील मुलांना देण्याची चाचणी सुरू आहे. त्यानंतर २ ते ६ वयोगटातील मुलांवर याची चाचणी केली जाईल. एम्समध्ये १२-१८ वयोगटातील मुलांची निवड करून त्यांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे. १२ मे पासून २ – १८ वयोगटातील मुलांच्या कोव्हॅक्सिन चाचणीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याला डीसीजीआयकडून परवानगी देण्यात आली आहे. ही चाचणी तीन टप्प्यात होणार आहे. त्यात १२-१८, ६-१२ आणि २-६ वयोगटातील १७५ मुलं प्रत्येक गटात समाविष्ट असतील. चाचणीदरम्यान पहिल्या डोसनंतर दुसरा डोस २८ दिवसांनी देण्यात येणार आहे.
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने भारत बायोटेक यांच्यासोबत मिळून कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसीचं उत्पादन केले आहे. सध्या वयस्क लोकांना कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात येत आहेत. लहान मुलांवर चाचणी सुरू आहे. त्यानंतर मुलांची सुरक्षा आणि त्यांच्यावर लसीचा झालेला परिणाम पाहून सरकार निर्णय घेईल. सध्या तज्त्रांनुसार कोविड १९ ची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे सरकार या तिसऱ्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी कोणत्याही स्थितीत तयारी करत आहे.