अंबरनाथमध्ये एक हजार महिलांना लसीकरण; रात्री नऊ वाजल्यापासून महिला रांगेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 08:07 PM2021-08-23T20:07:48+5:302021-08-23T20:08:43+5:30
अंबरनाथ नगर पालिकेच्या वतीने रक्षाबंधनाची भेट देण्याच्या अनुषंगाने एक हजार महिलांचे लसीकरण करण्याचा संकल्प राबविला होता.
अंबरनाथ:अंबरनाथ नगर पालिकेच्या वतीने रक्षाबंधनाची भेट देण्याच्या अनुषंगाने एक हजार महिलांचे लसीकरण करण्याचा संकल्प राबविला होता. हा संकल्प पालिकेने पूर्ण केला असून एकाच दिवशी तब्बल 1 हजार महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.
या लसीकरणासाठी महिलांनी देखील रात्री नऊ वाजल्यापासून रांगेत उभे राहून या संधीचा लाभ घेतला. अंबरनाथ नगरपालिकेने सोमवारी 1000 महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत दिवसभरात तब्बल 980 हून अधिक महिलांचे लसीकरण करण्यात आले. महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम असल्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी महिलांनी देखील रात्रभर रांगेत उभे राहून टोकण मिळविले. महिलांसाठी विशेष मोहीम असल्याकारणाने रात्रभर रुग्णालयाच्या बाहेर रांगेत उभे राहून या महिलांनी सकाळी लस घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. रांगेतील पहिल्या 200 महिलांना थेट लसीकरणासाठी नेण्यात आले तर उर्वरित 800 महिलांना टोकणचे वाटप करण्यात आले होते.
लसीकरणादरम्यान कोणताही गोंधळ उडू नये यासाठी पालिकेने चोख व्यवस्था केली होतीमात्र टोकण घेण्यासाठी महिला रात्रभर रांगेत उभे राहतील याची किंचितही कल्पना पालिका प्रशासनाला आली नव्हती. एवढेच नव्हे तर रात्रभर रांगेत उभ्या राहिलेल्या महिलांसाठी कोणतीही खास व्यवस्था करण्यात आली नाही. महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने या ठिकाणी महिलांचा पोलीस बंदोबस्तही देण्यात आला नव्हता. टोकन सिस्टम असले तरी वशिला बाजी करून टोकन0 देण्याचा प्रकार आणि लसीकरणासाठी थेट प्रवेश देण्याचा प्रकार हा आजच्या दिवशी देखील सुरू होता. सकाळी उशिरा टोकन घेण्यासाठी आलेल्या महिलांना टोकन न घेताच माघारी फिरावे लागले. सकाळी नऊ वाजता सगळे टोकन वाटून झाले होते. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत लसीकरण मोहीम सुरू होती.