थुंकाल तर सफाईची शिक्षा!
By Admin | Published: February 5, 2016 04:20 AM2016-02-05T04:20:06+5:302016-02-05T04:20:06+5:30
सार्वजनिक स्वच्छतेबाबतच्या कायद्याचा मसुदा अंतिम टप्प्यात असून अशा ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीस सफाईची शिक्षा ठोठावावी, ही तरतूद करण्यास सरकार गंभीर आहे
मुंबई : सार्वजनिक स्वच्छतेबाबतच्या कायद्याचा मसुदा अंतिम टप्प्यात असून अशा ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीस सफाईची शिक्षा ठोठावावी, ही तरतूद करण्यास सरकार गंभीर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून परळच्या टाटा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. हे माहीत असूनही ३०-३५ वयोगटातील व्यक्ती कर्करोगाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येते. हे ध्यानी घेता, थुंकण्याविरोधी कायद्याची चोखपणे अंमलबजावणी होणे अतिशय गरजेचे आहे. सध्या शिक्षा म्हणून काही रुपयांचा दंड आकारला जातो.
श्रीमंत व्यक्तींना १००-५०० रुपये दंड देणे सहज शक्य असते. पण, त्याऐवजी शिक्षा म्हणून त्यांना साफसफाई करायला लागली, तर थुंकण्याच्या सवयीला आळा बसू शकतो. त्यामुळे अशा शिक्षेची कायद्यात तरतूद करण्याचा विचार असून याविषयी काम अंतिम टप्प्यात आहे.
कर्करोग रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाइकांना मुंबईत राहण्याची सोय नसते. अशावेळी त्यांना रस्त्यावर, रुग्णालयाच्या व्हरांड्यात राहावे लागते. अशा नातेवाइकांचे हाल होऊ नयेत म्हणून विशेष इमारतींची सोय करण्यात येणार आहे. एसआरएच्या माध्यमातून तीन इमारती नातेवाइकांसाठी देण्यात येणार आहेत. याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येथे नातेवाइकांना इतर सुविधांसह भोजनाचीही सोयदेखील करण्यात येणार आहे.मध्य प्रदेशहून नागपूरमध्ये उपचारास येणारे कॅन्सरचे रुग्ण एवढे आहेत, की तेथून येणाऱ्या एका ट्रेनला ‘कॅन्सर ट्रेन’ असे संबोधले जाते. या रुग्णांवर येथील ‘संत तुकडोजी महाराज रुग्णालया’त उपचार होतात. येथे कर्करोगासाठी ३०० खाटांचे विशेष रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.