कोकणात खोळंबली भातलावणीची कामे
By admin | Published: July 12, 2017 04:28 AM2017-07-12T04:28:25+5:302017-07-12T04:28:25+5:30
सलामीलाच जोरदार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील भातशेतीही लावणीच्या प्रतीक्षेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : सलामीलाच जोरदार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील भातशेतीही लावणीच्या प्रतीक्षेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५५ टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ टक्के इतक्याच लावण्या पूर्ण झाल्या आहेत. रविवारपासून पावसाने पुनरागमन केल्यामुळे येत्या काही दिवसांत या कामाला अधिक गती येईल, अशी अपेक्षा आहे.
जूनमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. त्या काळात नांगरणी आणि पेरणीची कामे पारंपरिक वेळापत्रकानुसार झाली. मात्र जुलैमध्ये पावसाने दडी मारल्याने लावणीच्या कामाला चांगलीच खीळ बसली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तीन प्रकारची शेती आहे. डोंगर उतारावरची शेती, पायथ्याची शेती आणि सखल भागातील शेती. सद्य:स्थितीत सखल भागातील शेतीला पाण्याची कमतरता नाही. झालेल्या पावसाच्या आधारावर सखल भागातील लावण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, डोंगर उतारावरच्या आणि पायथ्याच्या शेतीला मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ७१ हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भातशेती केली जाते. आजच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यात ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ हजार हेक्टर क्षेत्रात लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. नागली, वरी आणि भाजीपाल्याची लागवड तुलनेने खूपच कमी आहे. मात्र, त्यालाही पावसाची प्रतीक्षा आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने नांगरणी आणि पेरणीची कामे वेळेत झाली. त्यामुळे रोपे चांगली तयार झाली आहेत. मात्र, चिखलणीसाठी पाऊसच नसल्याने तयार झालेली रोपे सुकून जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
>पंप लावून लावण्या
ज्या भागात शेताच्या जवळपास नदी किंवा मोठे ओढे आहेत, अशा भागात पंपाने पाणी खेचून शेती केली जात आहे. मात्र, त्यासाठी पंप भाड्याने आणावे लागत असल्याने ते खर्चिक होत आहे. त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहात आहेत.
जिल्हाएकूण क्षेत्रलावणी झालेलेटक्के
हेक्टरमध्येक्षेत्र (हे.)
रत्नागिरी७१,०००३९,०५०५५
सिंधुदुर्ग५०,२३०२०,७२७४१