१२ ते १५ वयोगटासाठी लसींची ऑर्डर; केंद्र सरकारला हवेत कोरबेव्हॅक्सचे पाच कोटी डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:04 PM2022-02-08T12:04:39+5:302022-02-08T12:05:54+5:30

लसीकरण मोहिमेत कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक ही लस दिली जात आहे. यातील ‘कोव्हॅक्सिन’ व ‘झायडस’सोबतच ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’ ही भारतात तयार होणारी तिसरी लस आहे.

Vaccine orders for 12 to 15 year olds; The central government wants five crore doses of corbevax | १२ ते १५ वयोगटासाठी लसींची ऑर्डर; केंद्र सरकारला हवेत कोरबेव्हॅक्सचे पाच कोटी डोस

१२ ते १५ वयोगटासाठी लसींची ऑर्डर; केंद्र सरकारला हवेत कोरबेव्हॅक्सचे पाच कोटी डोस

Next

सुमेध वाघमारे -

नागपूर: कोरोनाविरुद्धच्या लसीकरणात ३ जानेवारीपासून सुरू झालेल्या १५ ते १८ वयोगटांतील लसीकरणामुळे आणखी गती आली आहे. आता केंद्र सरकारने ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीच्या ‘कोरबेव्हॅक्स’ लसीचे ५ कोटी डोस विकत घेण्यासाठी संबंधित कंपनीला ऑर्डर दिली आहे. ‘कोरबेव्हॅक्स’ लसीची मानवी चाचणी नागपूर मेडिकलसह देशात दहा ठिकाणी झाली. ५ ते १८ वयोगटात झालेल्या या चाचणीमुळे लवकरच १२ ते १५ वयोगटात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

लसीकरण मोहिमेत कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक ही लस दिली जात आहे. यातील ‘कोव्हॅक्सिन’ व ‘झायडस’सोबतच ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’ ही भारतात तयार होणारी तिसरी लस आहे. या लसीची पहिली आणि दुसरी मानवी चाचणी १८ वर्षांवरील स्वयंसेवकांवर यशस्वी झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात पुणे व नागपूर मेडिकलमध्ये चाचणी झाली. इंजेक्शनच्या स्वरुपात दिल्या जाणाऱ्या या लसीच्या चाचणीच्या निष्कर्षानंतरच केंद्र सरकारने ‘कोरबेव्हॅक्स’ लसीचे ५ कोटी डोस विकत घेण्याची ऑर्डर दिली आहे. 

अशी झाली मानवी चाचणी -
‘कोरबेव्हॅक्स’ लसीची मानवी चाचणी ५ ते १२ व १३ ते १८ या दोन वयोगटांत घेण्यात आली. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस २८ दिवसांनंतर देण्यात आला. दोन्ही डोस ‘०.५ एमएल’चे होते. तिसरा डोस म्हणजे ‘बूस्टर’ डोसची चाचणी अद्यापही सुरू आहे. दुसऱ्या डोसच्या ४२ दिवसांनंतर तिसरा डोस दिला जात आहे.

- संबंधित कंपनीने हे डोस फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे. यामुळे मार्च महिन्यापासून १२ ते १५ 
वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता वाढली आहे.

३ मार्चनंतर होऊ शकते लसीकरण सुरू! -
२ ते १८ वयोगटात नागपुरात घेण्यात आलेल्या मानवी चाचणीचे संयोजक व बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी सांगितले, १५ ते १८ वयोगटात कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. आतापर्यंत जवळपास ८० टक्के किशोरवयीन मुलांना ही लस देण्यात आली. २० टक्के मुले शिल्लक आहेत. ते संपल्यावर साधारण ३ मार्चपासून १२ ते १५ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Vaccine orders for 12 to 15 year olds; The central government wants five crore doses of corbevax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.