Corona Vaccination: सर्व खासगी रुग्णालयांत मिळणार लस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 06:21 AM2021-03-03T06:21:50+5:302021-03-03T06:22:26+5:30
Corona Vaccination: केंद्राच्या राज्यांना सूचना. मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत देशातील १ कोटी ४८ लाख लोकांनाच कोरोनाची लस देण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकांना लवकरात लवकर कोरोनाची लस मिळावी आणि मोहिमेला वेग यावा, यासाठी सर्व खासगी रुग्णालयांमार्फत लसीकरण सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या. सध्याचा वेग अतिशय कमी असल्याने या सूचना केंद्राने दिल्या आहेत.
मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत देशातील १ कोटी ४८ लाख लोकांनाच कोरोनाची लस देण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षे वयावरील व्याधीग्रस्त यांना सोमवारीच लस देणे सुरू झाले आहे. त्यांची संख्याही तब्बल २७ कोटी असून, त्यांच्यातील २ लाख ८ हजार जणांचेच लसीकरण आतापर्यंत झाले आहे.
या वेगाने देशातील १३५ कोटी जनतेला लस देण्यास कित्येक वर्षे लागू शकतील. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मोहीम घेतली हाती
n खासगी रुग्णालयांमुळे लोकांना लवकर लस मिळू शकेल. या मोहिमेत खासगी रुग्णालये, दवाखाने, संस्था यांची मदत घ्यावी, असे आवाहन यापूर्वी अनेकांनी केलेच आहे.
n सध्या देशात १० हजार खासगी रुग्णालयांतच लस दिली जाते. पंतप्रधान जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांचाच सध्या लसीकरणासाठी समावेश आहे. याखेरीज काही हजार रुग्णालये ही लस देण्यासाठी तयार आहेत.
असे करण्याची दोन कारणे
आता सर्व खासगी रुग्णालयांत कोरोना लस देणे सुरू झाल्यास त्याचा वेग वाढेल आणि आताच्या टप्प्यातील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त यांचे लसीकरण लवकर पूर्ण होईल.
कोरोनावरील लस वेळेत न वापरल्यास ती खराब होते आणि ती देता येत नाही. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे उत्पादन व पुरवठा वेगाने होत आहे. त्यामुळे ठरावीक मुदतीत त्या दोन्ही लसी वापरण्याचे बंधन आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांत ही लस देण्याचे ठरले असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.