पश्चिम विदर्भातील लाखो जनावरांना रोग प्रतिबंधक लस
By admin | Published: June 23, 2016 09:44 PM2016-06-23T21:44:06+5:302016-06-23T21:44:06+5:30
पशुसंवर्धन विभागाची मोहीम; पावसाळ्यापूर्वी लसीकरणावर भर.
ब्रह्मनंद जाधव/बुलडाणा
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पशुधनांचे विविध रोगांपासून संरक्षणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील लहान व मोठय़ा अशा १ लाख ७0 हजार ३९१ जनावरांना विविध रोगांपासून संरक्षणासाठी रोग प्रतिबंधक लस देण्यात आली.
पावसाळ्यात होणार्या आजारांमुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते, तसेच पाळीव प्राण्यांच्या दुधावरही परिणाम होतो. त्यामुळे या जनावरांचे पावसाळ्यापूर्वी लसीकरण करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली आहे. पावसाळ्यापूर्वी या मोहिमेत अमरावती विभागातील १ लाख ७0 हजार ३९१ गायी, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा, बैल आदींचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात ७ हजार ९४0 लहान, मोठय़ा जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात २ हजार २७३, वाशिम जिल्ह्यात २८ हजार २३२, बुलडाणा जिल्ह्यात ९७ हजार ५१५ व यवतमाळ जिल्ह्यात ३४ हजार ४३१ पशूंचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील पशुधनाचे संवर्धन व्हावे, शेतकर्यांना त्याचा लाभ व्हावा, या उद्देशातून विभागातील पाच जिल्ह्यात लाखो जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून, सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.
या रोगांवर झाले लसीकरण
पशुसंवर्धन विभागाकडून घटसर्प, एकटांग्या, लाळ्या खुरकूत, फर्या, तोंडखुरी, पायखुरी, पीपीआर आदी संसर्गजन्य आजारांसाठी लसीकरण करण्यात येत आहे.
१ लाख ११ हजार गायी, म्हशींचा समावेश
अमरावती विभागातील १ लाख ११ हजार २२४ गायी व म्हशींचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात १ हजार ९४0, वाशिम जिल्ह्यात २७ हजार ३१३, बुलडाणा जिल्ह्यात ६४ हजार १४६ व यवतमाळ जिल्ह्यात १७ हजार ८२५ गायी व म्हशींचे लसीकरण करण्यात आले आहे.
अमरावती विभागात झालेले लसीकरण
जिल्हा जनावरांची संख्या
अमरावती ७९४0
अकोला २२७३
वाशिम २८२३२
बुलडाणा ९७५१५
यवतमाळ ३४४३१
एकूण १७0३९१