वडिवळे धरणाच्या देखभालीकडे होतेय दुर्लक्ष

By Admin | Published: May 19, 2016 02:23 AM2016-05-19T02:23:17+5:302016-05-19T02:23:17+5:30

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या वर्षी वडिवळे धरणात पाणीसाठा ३३ टक्केच आहे

Vadivale is under the care of the damaged and ignored | वडिवळे धरणाच्या देखभालीकडे होतेय दुर्लक्ष

वडिवळे धरणाच्या देखभालीकडे होतेय दुर्लक्ष

googlenewsNext


करंजगाव : सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या वर्षी वडिवळे धरणात पाणीसाठा ३३ टक्केच आहे. पाणी काटकसरीने वापरण्याची गरज असताना पाणी गळतीकडे आणि धरणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वडिवळे धरणाचा कालवा करंजगाव, गोवित्री, साबळेवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नाणे, कोळवाडी व इतर गावांतून
गेला आहे.
दोन दशकांपूर्वी प्रत्येक शिवार हे सुजलाम् सुफलाम् होते. परंतु कालवा असूनही पाणी वेळेवर मिळत नाही. शिवाय काही गावांना कालव्याचे पाणी बंद झाले आहे. कालवा बंद झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी कालवा पूर्णपणे बुजवला असून त्या ठिकाणी शेती केली जाते. कालवा काही ठिकाणी नादुरुस्त आहे.
मावळात धरण असूनदेखील ही काही गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेती ओसाड झाली आहे. वर्षाला एकच पीक घेण्याची वेळ तेथील शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाळ्यातील पाण्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसून कालवा सुरू होण्याची शेतकरी दोन दशके प्रतीक्षा करीत आहे. पाण्याची कसलीच सोय केली जात नसल्याने वडिवळे धरणालगतचे क्षेत्र ओसाड आहे.
काही ठिकाणी जनावरे छावणीत बांधली जातात. परंतु चारा मिळत नाही. धरणाच्या पायथ्याच्या मध्यभागी पाणी सोडण्यासाठीची व्हॉल्व्ह आहे. तेथे जाण्यासाठी सुमारे ४५ फूट उंचीचा लोखंडी जिना आहे. तो तुटलेला असून, गंजही चढला आहे. जोखीम पत्करूनच कामगारांना तेथे जावे लागते.
धरणावरील विद्युतविषयक समस्या मोठ्या प्रमाणात असून फ्युज डीपी, वायर, बोर्ड, बटण खराब अवस्थेत आहे. काही ठिकाणी होल्डरला बल्ब नाही. वायर लोंबलेल्या अवस्थेत आहेत. धरणाच्या पायाचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. पाणी सोडले जाते त्या ठिकाणी भिंतीचे सिमेंट निघून गज दिसू लागले आहेत. ते गंजण्याची शक्यता आहे.
धरणाला लागूनच अनेक छोटी-मोठी गावे आहेत. जलाशयात एखादी दुर्घटना घडल्यास मदतीसाठी होडी अथवा लॉँच नाही. जुनी होडी दुरवस्थेत पडून आहे. धरणातील पाणी इतर गावांना सोडण्यासाठी कालव्याचा वापर केला जातो. परंतु कालव्याला लागूनच अनेक झुडपे आहेत. माळरानातून येणारी माती कालव्यात पडत आहे.
मावळ तालुका जास्त पर्जन्यमानाचा असला, तरी शेतकऱ्यांना पाण्याअभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नाणे मावळात पाणी असूनही दुष्काळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी टॅँकरच्या साह्याने पाणी पुरवावे लागते. प्रशासनाने परिसर जलयुक्त करणे गरजेचे असून, कालवे व्यवस्थित करून पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच धरणावरील इतर कामे करून सुविधा पूर्ण करून गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.
शेतकऱ्यांना करंजगाव शिवारात पाणी देण्यासाठीची वाहिनी अर्धवट अवस्थेत सोडली आहे. पुढील काम कधी चालू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे, अशी करंजगावचे तंटामुक्ती अध्यक्ष कैलास वाटाणे यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली असता, जलवाहिनीचे उर्वरित काम निधी आल्यानंतर चालू होईल. काही वस्तू जीर्ण झाल्यात त्या बदलल्या जातील, असे जाधव यांनी सांगितले.

Web Title: Vadivale is under the care of the damaged and ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.