राणेंच्या विजयाचा वारू वैभव नाईकांनी रोखला

By admin | Published: October 19, 2014 10:01 PM2014-10-19T22:01:21+5:302014-10-19T22:26:58+5:30

१0 हजार ३७६ चे मताधिक्य : शिवसेना कार्यकर्त्यांचा जिल्ह्यात जल्लोष

Vaibhav Naik has won the victory of Rane | राणेंच्या विजयाचा वारू वैभव नाईकांनी रोखला

राणेंच्या विजयाचा वारू वैभव नाईकांनी रोखला

Next

सिंधुदुर्गनगरी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रचारप्रमुख तथा माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांचा शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी तब्बल १० हजार ३७६ मतांनी पराभूत केले. १९९० पासून २०१४ पर्यंत सलग २५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राजकीयदृष्ट्या वर्चस्व गाजविणाऱ्या राणे यांना विजयात सातत्य राखण्यापासून नाईक यांनी रोखले आहे. वैभव नाईक यांना ७० हजार ५८२ तर नारायण राणे यांना ६० हजार २०६ मते मिळाली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया १५ आॅक्टोबर रोजी पार पडली तर रविवारी सिंधुदुर्गनगरी येथील सामाजिक न्याय भवन येथे मतमोजणी प्रक्रिया अतिशय शांततेत व सुरळीत पार पडली. या मतमोजणीसाठी सी.आर.पी.एफ. जवान तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पार पडलेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेचे वैभव नाईक १० हजार ३७६ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांना ६० हजार २०६ मते मिळाली तर विजयी उमेदवार वैभव नाईक यांना ७० हजार ५८२ मते मिळाली. भाजपचे उमेदवार विष्णू मोंडकर यांना ४८१९ मते, बहुजन समाज पार्टीचे रविंद्र कसालकर यांना १०७१ मते, राष्ट्रवादीचे पुष्पसेन सावंत यांना २६३२ मते, अपक्ष उमेदवार स्नेहा केरकर यांना ७४७ एवढी मते मिळाली आहेत. तर ९४९ एवढी नकाराधिकार (नोटा) मते पडली.
गेली २५ वर्षे सिंधुदुर्गावर सत्ता असणाऱ्या काँग्रेसचे नारायण राणे यांचा शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी १० हजार ३७६ मतांनी पराभव केला आहे. रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. एकूण २० फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये वैभव नाईक यांनी आघाडी होती. त्यानंतर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर सर्वच फेऱ्यांमध्ये वैभव नाईक यांनी आघाडी घेत काँग्रेसचे नारायण राणे यांचा तब्बल १० हजार ३७६ मतांनी पराभव केला.
विजयी उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, हा माझा विजय म्हणजे सर्वसामान्य सिंधुदुर्गवासिय जनतेचा विजय आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू काढले त्यांना आपली जागा समजली आहे. बाळासाहेब आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर भगवा फडकविण्याचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी जिल्हावासियांमुळे मला मिळाली आहे. त्यांचे मी प्रथम आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवून येथील जनतेने मला विजयी केले आहे. मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी माझा सिंधुदुर्ग जिल्हा आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे यावेळी सांगितले.
शिवसेनेने काढली विजयी रॅली
विजयी उमेदवार वैभव नाईक यांनी सामाजिक न्याय भवन ते शिवाजी चौक (ओरोस फाटा) ते रवळनाथ मंदिरपर्यंत विजयी रॅली काढली. सुमारे २ हजार एवढ्या शिवसैनिकांनी हातात भगवा झेंडा घेत ही रॅली काढली. यावेळी गाड्यांचा ताफाही मोठ्या प्रमाणात होता. यावेळी वैभव नाईक यांनी रवळनाथ मंदिरात जावून दर्शन घेतले. त्यानंतर कुडाळच्या दिशेने रवाना झाले.
एक नजर राणेंच्या राजकीय करिअरवर
सन १९९० मध्ये मालवण विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांनी पहिली निवडणूक शिवसेनेत असताना लढविली होती. त्यावेळी त्यांना ३१ हजार २४४ मते मिळाली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर १९९५ मध्ये त्याच मतदारसंघात राणे यांना ५६ हजार १०१ मते मिळून विजय संपादन केला होता. १९९९ मध्ये पुन्हा त्याच मतदारसंघात राणे यांनी निवडणूक लढवून ४१ हजार २८ मते मिळवून विजय संपादन केला होता. २००४ च्या निवडणुकीत राणे यांना ६३ हजार ७८४ मते मिळवून एकतर्फी विजय मिळविला होता. त्यानंतर २००५ मध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राणे (काँग्रेस) हे ७८ हजार ६१६ मते मिळवून विजय प्राप्त केला. त्यानंतर २००९ च्या कुडाळ विधानसभा मतदारसंघात राणे यांना ७१ हजार ९२१ मते मिळून ते विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ च्या कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राणे मात्र १० हजार ३७६ मतांनी शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून पराभूत झाले आहेत.
अन् विजयी प्रमाणपत्र प्रदान
मतमोजणी पूर्ण झाल्यावर कुडाळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र बोंबले यांनी वैभव नाईक यांना विजयी घोषित केले. यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, निवडणूक निरीक्षक अमिताभ गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, कुडाळचे तहसीलदार जयराज देशमुख उपस्थित होते. यानंतर वैभव नाईक यांना बोंबले यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.
नाईक यांना कुडाळ येथे मताधिक्य
वैभव नाईक यांना मालवणमधून २५५६ मतांचे मताधिक्य मिळाले तर कुडाळ तालुक्यातून ७६४७ एवढे मताधिक्य मिळाले आहे. कुडाळ तालुक्यातील कसाल, हिर्लोक, वारंगाची तुळसुली, ओरोस, माणगांव आदी भागांमध्ये मताधिक्य मिळाले आहे.
चारजणांची अनामत रक्कम जप्त
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पुष्पसेन सावंत, भाजपचे उमेदवार बाबा उर्फ विष्णू मोंडकर यांच्यासह बसपाचे रविंद्र कसालकर आणि अपक्ष उमेदवार स्नेहा केरकर या चारही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे.
अनामत रक्कम वाचविण्यासाठी एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश एवढी मते उमेदवारास पडणे आवश्यक असते. कुडाळ मतदारसंघात एकूण १ लाख ४१ हजार ६६ एवढी वैध मते होती. त्यातील २३ हजार ५११ मते मिळणे आवश्यक होते. (प्रतिनिधी)

घटनाक्रम...
मतमोजणी सुरु होण्याच्या अगोदर सामाजिक न्याय भवन (सिंधुदुर्गनगरी) येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त.
प्रत्यक्षात आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ...
आपणास लीड आहे असे कळल्यावर शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी मतमोजणी केंद्रात सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी प्रवेश केला.
काँग्रेस उमेदवार राणे यांचा पराभव समोर दिसू लागल्याने मतमोजणी ठिकाणी प्रवेश केलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, अशोक सावंत, संजय पडते, राजन परब, दिनेश साळगांवकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतमोजणीस्थळ सोडले.
सकाळी ११ च्या सुमारास वैभव नाईक यांचा विजय निश्चित झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष.
फटाके फोडून साजरा केला जल्लोष.
मतमोजणी सुरु असताना मतमोजणी महिला कर्मचाऱ्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
आमदारकीच्या शर्यतीत उडी मारलेल्या बसपाचे उमेदवार रविंद्र कसालकर यांनी मतमोजणी ठिकाणी शेवटी हजेरी लावली होती.

Web Title: Vaibhav Naik has won the victory of Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.