वैभव नाईकांनी घेतली रविंद्र चव्हाणांची गुप्तभेट? कारण काय; जायंट किलर आमदारानेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 01:58 PM2024-02-16T13:58:06+5:302024-02-16T13:58:44+5:30
शिंदेंच्या बंडावेळी देखील वैभव नाईक कोणत्या गटात जाणार यावरून चर्चा रंगली होती. परंतु वैभव नाईकांचा मतदारसंघ हा त्यांचे कट्टर विरोधक नारायण राणेंचा असल्याकारणाने माशी शिंकली होती.
कोकणातील हेविवेट नेते नारायण राणे यांना पराभूत करून राज्यात जायंट किलर ठरलेल्या वैभव नाईकांनी गुरुवारी भाजपाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांची गुप्त भेट घेतली. यावरून उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. यावर चव्हाण यांनी आपण नारायण राणेंना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षप्रवेश देणार नाही असे स्पष्ट केले होते, तर आज वैभव नाईकांनी काल झालेल्या भेटीचे कारण सांगितले आहे.
शिंदेंच्या बंडावेळी देखील वैभव नाईक कोणत्या गटात जाणार यावरून चर्चा रंगली होती. परंतु वैभव नाईकांचा मतदारसंघ हा त्यांचे कट्टर विरोधक नारायण राणेंचा असल्याकारणाने माशी शिंकली होती. आता नारायण राणे लोकसभेला उभे राहणार असल्याची चर्चा असताना वैभव नाईकांची चव्हाण यांच्यासोबतची गुप्तभेट राज्यात चर्चिली जाऊ लागली आहे.
माझ्या भेटीवरून रविंद्र चव्हाण यांनी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांच्यात आणि राणेंमध्ये अंतर्गत धुसफुस असल्याचे समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर भाजपाला धडकी भरली आहे. त्यांना लोकसभेला इथे उमेदवार मिळत नसल्याने भ्रमिष्ट झाले आहेत. मला अनेक पक्षांच्या ऑफर होत्या, मंत्रिपदाच्याही होत्या. मात्र मी पक्षाशी निष्ठावंत असल्याचे नाईक म्हणाले.
चव्हाण हे नियोजित कणकवली दौऱ्यावर आले होते. उड्डाणपुलाच्या कामा संदर्भात त्यांची भेट घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर गेलो होतो. त्यांनी या पुलाच्या कामात काही बदल सुचविले होते. हे काम लवकर पूर्ण व्हावे अशी विनंती करण्यासाठी मी गेलो होतो. राणे यांच्यामुळे काही विकासकामे त्यांना मार्गी लावता येत नाहीएत. माझी भेट खुलेआम होती, बंद दाराआड नव्हती. त्यांना जनाधार राहिला नाही म्हणून अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात असल्याचे नाईक म्हणाले.