वैभव रास्कर ठरला कामगार केसरी
By admin | Published: March 25, 2017 01:57 AM2017-03-25T01:57:47+5:302017-03-25T01:57:47+5:30
चुरशीच्या रंगलेल्या लढतीत सांगलीचा पैलवान वैभव रास्कर याने साताऱ्याच्या विकास पाटीलवर तांत्रिक गुणाच्या आधारे मात करुन
मुंबई : चुरशीच्या रंगलेल्या लढतीत सांगलीचा पैलवान वैभव रास्कर याने साताऱ्याच्या विकास पाटीलवर तांत्रिक गुणाच्या आधारे मात करुन प्रतिष्ठेच्या कामगार कुस्ती स्पर्धा विजेतेपदावर कब्जा केला. त्याचवेळी, कुमार केसरीसाठी झालेल्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या विक्रम मोरेने बाजी मारली.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ना.म. जोशी मार्गावरील कामगार मैदानात रंगतदार कुस्ती पार पडल्या. मुंबई शहर तालिम संघाच्या सहकार्याने खेळवण्यात आलेल्या कामगार केसरीच्या अंतिम सामन्यात कुंडल येथील पैलवान वैभवने आक्रमक सुरुवात केली. प्रत्युत्तरात साताऱ्याचा विकासने शानदार बचाव करत प्रतिडाव रचत वैभवला झुंजवण्याचा चांगला प्रयत्न केला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात निर्णायक गुणांची कमाई करताना तांत्रिक गुणाच्या आधारे वैभवने बाजी मारत मानाची गदा उंचावली.
कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या कुमार केसरी स्पर्धेतही तांत्रिक गुणांच्या आधारे कोल्हापूर, कुंभी कासरीच्या विक्रम मोरेने विजय मिळवला. सरदार बरगेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कामगार केसरी आणि कुमार केसरी विजेत्या रोख रक्कम, गदा, मानाचा पट्टा व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील अन्य लढतीत ५७ किलो वजनी गटात नामदेव घाडगे, ६१ किलो वजनी गटात दिलीप शेंबडे, ६५ किलो गटात अमोल पवार, ७० किलो गटात दिग्विजय जाधव आणि ७४ किलो वजनी गटात भगतसिंग खोत यांनी अव्वल क्रमांक पटकावला. (क्रीडा प्रतिनिधी)