विद्यार्थ्यांचे छळवणूक प्रकरण : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 04:40 PM2017-07-31T16:40:49+5:302017-07-31T16:47:09+5:30

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाकडील प्रा. व्ही. बी. स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

vaidayaarathayaancae-chalavanauuka-parakarana-vaalacanda-abhaiyaantaraikai-mahaavaidayaalayaacae | विद्यार्थ्यांचे छळवणूक प्रकरण : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक निलंबित

विद्यार्थ्यांचे छळवणूक प्रकरण : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक निलंबित

Next

सांगली, दि. 31 -  वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाकडील प्रा. व्ही. बी. स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रा. स्वामी यांच्यावर विद्यार्थ्यांची छळवणूक, विद्यार्थिंनीशी वाईट वागणूक, तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांना नापास करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात प्रा. स्वामी यांच्यावर छळाचा आरोप करुन एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत महाविद्यालयाचे संचालक डॉ. जी. व्ही. परिशवाड यांनी स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 


गेल्या आठवड्यात दिगंबर भांगे या मेकॅनिकल विभागाच्या तिस-या वर्षात शिकणा-या विद्यार्थ्याने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होतो. ‘अपलाईड थर्मो डायनॅमिक्स’ या विषयात तो नापास झाला होता. या विषयाचे प्राध्यापक व्ही. बी. स्वामी यांच्या दडपणामुळेच त्याने हे कृत्य केल्याचा आरोप करून विद्यार्थ्यांनी आंदोलन हाती घेतले होते. विद्यार्थ्यांनी एक दिवस मॅकेनिकल विभागावर बहिष्कार टाकून प्रा. स्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. 


या घटनेची दखल घेत संचालक डॉ. परिशवाड यांनी विद्यापीठ अधिनियमानुसार चौकशी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सम्यक विद्यार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल वेटम, अनिकेत भंडारे, प्रसन्नजित एरंडोलीकर, रोहन बनसोडे, प्रतिक विटेकर, ऋषभ वडगावे, प्रथमेश भोसले, प्रसन्नजीत कांबळे आदींनी जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख व संचालकांना निवेदन देऊन प्रा. स्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
अखेर संचालक परिशवाड यांनी स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. परिशवाड म्हणाले की, प्रा. स्वामी यांच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कारवाई  केली आहे. या तक्रारींच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, असे सांगितले. 
 
प्राध्यापकावर गंभीर आरोप
मेकॅनिकल विभागात  सहाय्यक प्राध्यापक असलेले स्वामी हे चार वर्षापूर्वी वालचंद महाविद्यालयात रुजू झाले होते. त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. निलंबनाची कारवाई करतानाही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यात विद्यार्थ्यांचा छळ, त्यांना धमकी देणे, विद्यार्थिंनी अवांतर वेळेत केबीनमध्ये बोलावून वाईट वागणूक देणे, तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांना वारंवार नापास करणे, असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

Web Title: vaidayaarathayaancae-chalavanauuka-parakarana-vaalacanda-abhaiyaantaraikai-mahaavaidayaalayaacae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.