वाणींनी सुचवलेल्या उमेदवाराला वैजापूरकरांनी पाठवले विधानसभेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 17:00 IST2019-10-26T16:53:29+5:302019-10-26T17:00:25+5:30
ऐनवेळी प्रकृतीचा कारण देत वाणी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे पक्षाला कळवल्याने,शिवसेनेला उमेदवार शोधण्याची वेळ आली होती.

वाणींनी सुचवलेल्या उमेदवाराला वैजापूरकरांनी पाठवले विधानसभेत
मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून आलेले रमेश बोरनारे यांची विधानसभेत निवडून येण्याची पहिलीच वेळ आहे. वैजापूर मतदारसंघातून युतीकडून कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाने माजी आमदार आर.एम.वाणींना दिला होता. त्यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख असलेल्या रमेश बोरनारे यांच्या नावाची शिफारस वाणी यांनी केली होती. विशेष म्हणजे वाणींनी सुचवलेल्या या उमेदवाराला वैजापूरकरांनी पसंती देत विधानसभेत पाठवले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून वैजापूर मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिलेले आर.एम वाणी यांच्या नवाची चर्चा सुरु होती. मात्र ऐनवेळी प्रकृतीचा कारण देत वाणी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे पक्षाला कळवल्याने,शिवसेनेला उमेदवार शोधण्याची वेळ आली होती. परंतु वैजापूर मतदारसंघाबाबत शिवसेनेच्या उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेऊ, मात्र वैजापूरच्या उमेदवारीसाठी वाणींच्या शब्दाला महत्व असेल असे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले होते.
वैजापूरच्या उमेदवारीसाठी वाणींच्या 'शब्दाला' महत्व असेल: चंद्रकात खैरे
पुढे पक्षाच्या बैठकीत वाणी यांनी रमेश बोरनारे यांचे नाव सुचवले आणि पक्षाने सुद्धा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. निवडणुकीच्या काळात बोरनारे यांना निवडणून आणण्यासाठी वाणींनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे वाणी यांनी सुचवलेल्या उमेदवाराला वैजापूरकरांनी सुद्धा निवडून दिले. रमेश बोरनारे यांनी राष्ट्रवादीचे अभय चिकटगावकर यांचा तब्बल ५८ हजार ८१८ मतांनी पराभव करत विजय मिळवला.
वैजापूर मतदारसंघातून युतीकडून उमेदवारी मिळावी म्हणून माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले होते. मात्र जागा युतीत शिवसेनेकडे असल्याने अखेर बोरनारे यांना उमेदवारी देण्यात आली. वाणी यांनी जरी माघार घेतली असली तरीही त्यांना मानणारा एक मोठ वर्ग मतदारसंघात असल्याने, पक्षाने उमेदवार सुचवण्याची जवाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. तर वाणी यांनी बोरनारे यांना उमेदवारी बरोबर आमदारकी सुद्धा मिळवून दिली.