शेती अन् मातीसाठी लढणाऱ्या वैशाली येडेंना मतदारांनी डावलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:53 PM2019-05-28T16:53:11+5:302019-05-28T17:01:23+5:30
आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी देखील मोठ्या हिंमतीने मतदार संघात प्रचार केला.
मुंबई - परिवहन महामंडळाच्या बसमधून लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या वैशाली येडे यांना यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात पराभव पत्करावा लागला. लोकशाही मार्गाने शेती आणि मातीसाठी लढा देण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वैशाली यांना मतदारांनी डावलले. देशात ५० टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. तर एक महिला खासदार बॉम्बस्फोट कटातील आरोप आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले ही लोक लाखांच्या मताधिक्याने निवडून येतात. मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी वैशाली येडे यांना मतदार डावलतात. याला लोकशाहीचे अपयश म्हणाव का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी देखील मोठ्या हिंमतीने मतदार संघात प्रचार केला. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वैशाली यांचे पती सुधाकर यांनी आत्महत्या केली होती. नवऱ्याच्या निधनानंतर वैशाली देखील त्यांचा मार्ग निवडू शकत होत्या. मात्र वैशाली यांनी लढण्याचा निर्णय घेतला. हार न मानता वैशाली यांनी दोन मुलांचे संगोपन केले.
शेतकरीच शेतकऱ्यांची अडचण समजू शकतो, या मुद्दावर त्या लोकसभा निवडणुकीला सामोरे गेल्या. निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी माझ्याकडे केवळ ५०० रुपये होते. निवडणुकीसाठी पैसा उभा करण्याचे मुख्य आव्हान होते. मी लोकांना पैसा आणि मत दोन्ही देण्याचे आवाहन केले, असं वैशाली सांगतात. पुरेसा पैसा नसल्यामुळे वैशाली यांनी महामंडळाच्या बसमधून प्रचार केला. शेतकरी प्रतिनिधी संसदेत पाठविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केल्याचे वैशाली यांनी म्हटले. परंतु, त्यांना यश आले नाही.
शेतकरी आत्महत्या, गरीबी आणि शेती क्षेत्रातील सुधारणांवर वैशाली यांनी निवडणूक लढवली. मात्र मतदार संघातील मतदारांनी या मुद्द्यांना फारसं प्राधान्य दिले नाही. मतदारांनी शेती आणि मातीसाठी लढा देणाऱ्या वैशाली येडे यांना नाकारले.
संधी मिळाल्यास पुन्हा लढणार
वैशाली येडे यांना लोकसभा निवडणुकीत २० हजार मते मिळाली. शेतकऱ्यांनी मला विजयी केले नाही. पण तरी देखील मी २० हजार मतदारांचा विश्वास संपादन करू शकले. त्यामुळे मी हार मानली नाही. संधी मिळाल्यास आपण पुन्हा निवडणूक लढवू, अस वैशाली येडे यांनी सांगितले.