वैजनाथ भोईर यांचे निधन
By Admin | Published: October 21, 2014 03:51 AM2014-10-21T03:51:53+5:302014-10-21T03:51:53+5:30
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ भोईर यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ भोईर यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि तीन बंधू व बहीण असे कुटुंब आहे.
वैजनाथ भोईर हे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यासोबतच्या मित्रांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. भोईर हे मूळचे भार्इंदरजवळील मोरवा गावचे रहिवासी.
शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा प्रारंभ केला. लोकसाथी दिवाळी अंक, लोकसत्ता दैनिकाचे वार्ताहर आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे (भार्इंदर) अध्यक्ष म्हणून त्यांनी
काम पाहिले.
ठाणे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे संमेलनही त्यांनी ज्येष्ठ पत्रकार विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले होते.
ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांच्याशी त्यांचा उत्तम स्नेह
होता. शिवाय लोकसाथी दिवाळी अंकाची प्रकाशने ज्येष्ठ कवी
मंगेश पाडगावकर, शंना नवरे, मधू मंगेश कर्णिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते झाली होती.
सोमवारी दुपारी ३ वाजता वैजनाथ भोईर यांच्या पार्थिवावर मोरवा या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांचे सहकारी आणि गावातील हजारो नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)