लोणीत विसावला वैष्णवांचा मेळा
By admin | Published: July 13, 2015 12:57 AM2015-07-13T00:57:30+5:302015-07-13T00:57:30+5:30
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी जगतगुरु तुकाराम महाराज पालखीने पहाटे पुण्यातून प्रस्थान ठेवले. विश्रांतीने ताजेतवाने झालेल्या वारकऱ्यांचे
लोणी काळभोर (जि. पुणे): दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी जगतगुरु तुकाराम महाराज पालखीने पहाटे पुण्यातून प्रस्थान ठेवले. विश्रांतीने ताजेतवाने झालेल्या वारकऱ्यांचे सोलापूर रोडवरुन हरीनामाच्या गजरात रविवारी सायंकाळी लोणी काळभोर भागातील पहिल्या मुक्कामस्थळी आगमन झाले़ लोणी काळभोरकरांनी पालखी सोहळ्याचे फुलांचा वर्षाव करुन ढोलताशांच्या निनादात स्वागत केले़
अभंगाच्या ओळी गात सावळ्या विठूरायाच्या भेटीस आतुरलेली लाखो वैष्णवांची मांदियाळी पुण्यनगरीचा दोन दिवसांचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन मार्गस्थ झाली. टाळ मृदूंगाच्या निनादात व टाळ-चिपळ्यांच्या तालावर मंत्रमुग्ध झालेल्या वारकऱ्यांसह जगतगुरू संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोरमध्ये आल्यावर विविध सामाजिक संस्था, संघटना व मंडळांचे कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी सर्व वारकरी टाळमृदूंगाच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होते़ काही जण फुगड्या खेळत होते तर काहींनी मानवी मनोरे उभारून आनंद व्यक्त केला.
पुणे येथील निवडुंग्या विठोबा मंदिरात रविवारी सकाळी प्रक्षाळपूजा व समाजआरती झाल्यानंतर पालखी रथात ठेवण्यात आली. पालखी सोहळा पुलगेटमार्गे हडपसर येथे आला.