वैष्णवांची मांदियाळी पंढरपुरासमीप, ५ लाख वारकरी पंढरीच्या वाटेवर
By Admin | Published: July 1, 2017 12:22 PM2017-07-01T12:22:33+5:302017-07-01T12:22:33+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
बाळासाहेब बोचरे: सोलापूर
एक गाऊ विठु तुझे नाव
आणिकाचे काम नाही
आषाढी वारी कधी येईल आणि सावळ्या पांडुरंगाला कधी एकदा भेटेन या उत्कट ओढीने गेले काही दिवस ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता हरिनामाचा जयघोष करत विविध संत आणि सज्जनांच्या पालख्यांसोबत पंढरीच्या दिशेने निघालेली वैष्णावांची मांदियाळी पंढरपुरासमीप आली आहे. सुमारे पाच लाखांचा वैष्णवांचा दळभार पंढरपूर तालुक्यात दाखल झाला आहे.
आळंदीहून आलेली संत ज्ञानेश्वर माऊली, देहूहून आलेली जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी यांच्यासमवेत सुमारे चार लाख वारकरी असून या दोन पालख्यांनी शनिवारी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. माऊली भंडीश्ोगाव येथे तर तुकाराम महाराजांची पालखी वाडीकुरोली येथी मुक्कामी गेली. याच मार्गाने संत सोपानदेवही पंढरपूर तालुक्यात दाखल झाले असून त्यांच्यासमवेत १५ हजार वारकरी आहेत. याच बरोबर संताजी महाराज जगनाडे, बालयोगी, चौरंगीनाथ, संभाजी महाराज,सेना महाराज अशा विविध पालख्यांनीही याचा मार्गाने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला आहे. अहमदनगर मार्गाने आज संत निवृत्ती नाथ व संत एकनाथांच्या पालखीने प्रवेश केला असून करकंब येथे या पालख्या मुक्कामी आल्या आहेत. सुमारे ५५ हजार वारकरी त्यांच्यासमवेत आहेत. मुक्ताईनगर येथून आलेली संत मुक्ताईची पालखी शनिवारी पंढरपुरात दाखल झाली आहे त्याचबरोबर श्ोगावच्या गजानन महाराजांचीही पालखी पंढरपुरात दाखल झाली असून दोन्ही मिळून दीड हजार वारकरी त्यांच्यासमवेत आहेत.
-----------------------------
संत एकनाथांच्या पालखीसाठी कौठाळी येथे चंद्रभागा नदीवर पूल बांधण्यात आला आहे. हे काम प्रशासनाने वेळेआधीच आणि चांगले केले आहे. यामुळे एकनाथांचा मार्ग सुकर झाला आहे. उर्वरित मार्गात असलेल्या गैरसोयीही दूर करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे.
- रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले
सोहळाप्रमुख संत एकनाथ महाराज पालखी