बड्या IT कंपनीतील नोकरी सोडून 'ती' सैन्यात दाखल; लेफ्टनंट म्हणून होणार रूजू
By नरेश डोंगरे | Updated: March 17, 2025 22:15 IST2025-03-17T22:14:23+5:302025-03-17T22:15:03+5:30
आता ती १ एप्रिलपासून गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण घेणार आहे

बड्या IT कंपनीतील नोकरी सोडून 'ती' सैन्यात दाखल; लेफ्टनंट म्हणून होणार रूजू
नरेश डोंगरे
नागपूर : ती एका बड्या आयटी कंपनीत चार वर्षांपासून कार्यरत होती. सर्वकाही चांगले सुरू होते. मात्र, देश भक्तीची भावना घेऊन जगणाऱ्या वैष्णवी कमलकिशोर गभने या तरुणीने सेनेशी जुळण्याचे स्वप्न रंगविले. त्यासाठी तिने इंडियन डिफेन्स सर्व्हीसेस (आर्मी -एसएससी-टेक) परिक्षा पास केली. आता वर्षभराच्या ट्रेनिंगनंतर ती सेनेत लेफ्टिनंट म्हणून सेवा देणार आहे.
२६ वर्षीय वैष्णवी म्हणते की, सेनेत दाखल होण्याचे स्वप्न तिने दहावीत असतानापासूनच बघितले होते. हे स्वप्न आता पूर्ण झाले. त्यासाठी मागच्या वर्षी तिने शॉर्ट सर्व्हीस कमिशन (एसएससी टेक) परिक्षा दिली. ती उत्तीर्ण झाल्यानंतर पाच दिवसपर्यंत मुलाखत चालली. पहिल्या दिवशी स्क्रिनिंग आणि पुढच्या चार दिवसांत मानसिक तसेच शारिरिक क्षमतेचे मुल्यांकन झाले. सर्वच परिक्षांमध्ये यश मिळाले आणि जेव्हा निकाल घोषित झाला तेव्हा ती सहावी मेरिट ठरली. आता ती १ एप्रिलपासून गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण घेणार आहे. त्यानंतर तिला लेफ्टनंट म्हणून तैनात केले जाईल. आपल्याला देशसेवेची संधी मिळाली, हे आपल्यासाठी फारच आनंददायक असल्याचे वैष्णवी म्हणाली.
वडिलांचीही स्वप्नपूर्ती !
वैष्णवीचे वडिल कमलकिशोर गभणे महावितरुणचे निवृत्त अधिकारी आहेत. सेनेत दाखल होऊन देशसेवा करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, ती पूर्ण झाली नाही. तथापि, मुलीच्या रुपात वैष्णवीने कमलकिशोर गभणे या पित्याची इच्छाच नव्हे तर स्वप्नही पूर्ण केले. वैष्णवीने आपल्या आईवडिलांसह कुटुंबियांना मानसिकरित्या तयार केले आहे. परिवारही तिच्या सोबत असून, आपली लाडकी सेनेत दाखल होत असल्याचा आपल्याला गर्व असल्याचे तिचे वडिल म्हणतात.