वैष्णवांचा मेळा बरडला विसावला!
By admin | Published: June 28, 2017 01:45 AM2017-06-28T01:45:04+5:302017-06-28T01:45:04+5:30
सातारा जिल्ह्यातील चौथ्या व फलटण तालुक्यातील तिसऱ्या मुक्कामासाठी श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा मंगळवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील चौथ्या व फलटण तालुक्यातील तिसऱ्या मुक्कामासाठी श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा मंगळवारी (दि. २७) बरड येथे विसावला. पालखीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. बरड येथील मुक्काम आटोपून बुधवारी (दि. २८) सोहळा सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
फलटण शहरातील मुक्काम आटपून पालखी सोहळा मंगळवारी ‘माझ्या मनीची आवडी, पंढरपुरा नेईन गुडी’ या उक्ती प्रमाणे पांडुरंगाच्या भेटीसाठी बरडकडे मार्गस्थ झाला. वाटेत धुळदेव ग्रामस्थानी स्वागत केले. यावेळी कोळकी, सोमंथळी, झिरपवाडी, सांगवी, अलगुलेवाडी, भाडळी आदी गावांमधील ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले. यानंतर हरिनामाचा गजर व टाळ-मृदंगाच्या निनादात सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर तेथून मार्गस्थ झाला. सोहळा जेवणासाठी पिंप्रद येथे विसावला. शेवटच्या मुक्कामासाठी बरड येथे विसावला.
खुडूसला गोल रिंगणाची तयारी -
माळशिरस तालुक्यातील खुडूस (जि. सोलापूर) येथे ३० जून रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण होणार आहे़ या रिंगण सोहळ्याची व पालखी स्वागताची तयारी पूर्ण झाल्याची माहिती खुडूस ग्रामपंचायतीचे गटनेते डॉ. तुकाराम ठवरे यांनी दिली.
आज सोलापूर
जिल्ह्यात प्रवेश
लाखो वारकरी भाविकांचा हा पालखी सोहळा बुधवारी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून तालुका व जिल्ह्याच्या सीमेवर राजुरी या गावच्या हद्दीत सातारा जिल्ह्याच्या वतीने निरोप व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागताचा समारंभ होणार आहे.