नवसाने मुल झालं अन् मुके घेवून मारलं, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 05:51 PM2018-04-02T17:51:45+5:302018-04-02T17:51:45+5:30
नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं अशी परिस्थिती या सरकारची होऊ नये, अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात ते बोलत होते.
कोल्हापूर : नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं अशी परिस्थिती या सरकारची होऊ नये, अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात ते बोलत होते.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महापुरुषांच्या फोटोत भ्रष्टाचार केला. पंकजा मुंडे यांनी लहान मुलांच्या चिक्कीत घोटाळा केला. आमच्या मराठवाडयात एक म्हण आहे नवसाने मुल झालं आणि मुके घेवून मारलं अशी परिस्थिती या सरकारची होवू नये असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. काल आम्ही अंबाबाईचा रथ ओढला आणि अंबाबाईला राज्यात जे सरकार बसलं आहे ते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. तेव्हा या सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्हाला बळ मिळो असं साकडं घातल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. काल देशभरात एप्रिल फुलच्या निमित्ताने लोकांनी मोदीजींचा वाढदिवस साजरा केला. मोदींचं सरकार आल्यापासून देशातील जनतेचा रोजच एप्रिल फुल होत असल्याची टीकाही मुंडे यांनी केली.
ललित मोदी पैसे घेवून पळाले, मल्ल्या पैसे घेवून पळाला, नीरव मोदी पैसे घेवून पळाला. असेच जर हे लोक पळू लागले तर १५ लाख खात्यात यायचे सोडा आपल्यावरच कर्ज होण्याची भीती आता निर्माण झाली आहे. बेरोजगारी, महागाई, वाढते गुन्हे यासाठी हे आंदोलन असल्याचे सांगून आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की वर नरेंद्र, खाली देवेंद्र आणि मंत्रालयात उंदर आहेत असा टोलाही लगावला. मुंडे यांनी आपल्या भाषणात सरकारवर चौफेर टिका करतानाच सभेमध्ये जान आणली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या सभेलाही जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. सभेच्या सुरुवातीला भुदरगड शहरातील हुतात्मा चौकात शहीदांना मानवंदना देण्यात आली.
या सभेत आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार के.पी.पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार रणजितसिंह मोहितेपाटील,आमदार रामराव वडकुते,आमदार प्रकाश गजभिये,आमदार जयदेव गायकवाड,आमदार श्रीमती संध्या कुपेकर,माजी आमदार के.पी पाटील,जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील,ओबीसी सेलचे अध्यध ईश्वर बाळबुधे,युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील,विदयार्थी अध्यक्ष अजिंक्य राणापाटील आदींसह भुदरगड,चंदगड,गारगोटी आणि परिसरातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.