मराठा समाजाची वज्रमूठ भक्कम

By Admin | Published: April 20, 2017 01:08 AM2017-04-20T01:08:11+5:302017-04-20T01:08:11+5:30

महागोलमेज परिषदेत व्यक्त झाल्या भावना

Vajramudha of the Maratha community is strong | मराठा समाजाची वज्रमूठ भक्कम

मराठा समाजाची वज्रमूठ भक्कम

googlenewsNext

कोल्हापूर : मराठा समाजातील असंतोष मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने बाहेर पडला आहे. आपले नाही तर आपल्या पुढच्या पिढीचे चांगले होईल, हीच भावना प्रत्येक सामान्य मराठा समाजातील व्यक्तींची आहे. प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा, पद, हेवे-दावे, राजकारण बाजूला ठेवून ‘मराठा’ समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र आल्याने, आता ‘मराठा’ समाजाची वज्रमूठ भक्कम झाल्याची भावना बुधवारी महागोलमेज परिषदेत व्यक्त झाली. तब्बल आठ तास चाललेल्या परिषदेत समाजाच्या विविध मागण्यांबाबत विचारमंथन झाले.
येथील मुस्कान लॉन येथे क्षत्रिय मराठा चेंबर्स आॅफ कॉर्मसच्या पुढाकाराने सकल मराठा समाज महागोलमेज परिषद झाली. अध्यक्षस्थानी शशिकांत पोवार होते. परिषदेला राज्यातील सुमारे पाचशे सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील विविध सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांना शेती, शिक्षण, व्यवसाय, उद्योग आणि आरक्षण या विषयांवर आपल्या नव्या कल्पना व सूचना केल्या. यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये पुणे येथील आप्पासाहेब पुणेकर म्हणाले, ज्या-ज्या वेळेला याचिकाकर्ते याचिका न्यायालयात दावे दाखल करतील त्याची माहिती सोशल मीडियाद्वारे द्यावी. ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी याचिका दाखल करावी मात्र आपल्या याचिकेमुळे मराठा समाजाचे आरक्षण लांबले जाणार नाही याची काळजी घ्यावी.
औरंगाबाद येथील रवींद्र काळे-पाटील म्हणाले, दुभंगलेली मने व दुरावलेली माणसे एकत्र येण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. एकीची वज्रमूठ अधिक घट्ट होणार आहे. सोशल मीडियावरील सकल मराठा समाजाबाबतची आचारसंहिता करण्यात यावी. संभाजीनगरचे किशोर शितोळे म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर, वीज, पाणी अशा पायाभूत गोष्टी पुरविल्या पाहिजेत. मराठ्यांनी समाज म्हणून एकत्र यावे. स्नेहल दुर्गुळे म्हणाली, आता चर्चा, समिती थांबवून कृती करून क्रांतिकारी पाऊल उचलण्याची गरज आहे. त्यासाठी जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात.
मुंबईचे पंकज घाग म्हणाले, मराठा समाजाने नोकरी न मागता नोकरी देणारे हात घडवायला हवेत. यासाठी फोरम निर्माण करून व्यवसाय-व्यापार, उद्योगामध्ये मराठा टक्का कसा वाढेल हे पाहिले पाहिजे. अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, आरक्षण मिळवायचे असेल तर त्यासाठी टोकाची लढाई करावी लागेल. न्यायालय म्हणते तुम्ही मागास आहात; त्याचे पुरावे सादर करा, पुरावे सादर करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याची आहे. गायत्री राऊत म्हणाल्या,आम्ही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर मूकपणे आलो; पण अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही.


मराठा समाजातील घटक म्हणून येथे आलोय : संभाजीराजे
हातात तलवार घेऊन लढणाऱ्या मराठ्याच्या अभूतपूर्व शिस्तीचे दर्शन मराठा क्रांती मोर्चाने दिले. खऱ्या अर्थाने मराठा समाजाची ताकद जगाला दिसली आहे. त्यामुळे आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. मी येथे मराठा समाजातील एक घटक म्हणून आलो असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
ते म्हणाले, समाजाने आपली प्रतिष्ठा, पद बाजूला ठेवून एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी चर्चा केली पाहिजे. शिक्षण, शेती, व्यवसायात मराठा समाजाची प्रगती कशाप्रकारे करता येईल याबाबत सविस्तर चर्चा केली पाहिजे. यासाठी सकल मराठा समाजाची जी काही भूमिका असेल, तीच माझी भूमिका असेल.
आपण एकसंघ राहत नाही तोपर्यंत सरकार आपली दखल घेणार नाही. भक्कम, अभ्यासपूर्ण मुद्दे काढून सरकारसमोर मांडूया. समाजासाठी योगदान, वेळ देणाऱ्यांची एक समिती तयार करा. कोणत्याही नेत्याला घेऊन पुढे जाऊ नका. यश आपल्या हातात आहे. त्यासाठी आपली एकजूट कायम ठेवू.


समितीचे पद लावणार नाही
मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सरकारदरबारी पाठपुरावा या राज्यस्तरीय समन्वय समितीद्वारे केला जाईल, असे संजीव भोर-पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, समितीत जिल्हानिहाय प्रतिनिधी घेतले जातील. समिती अंतिम झाल्यानंतर त्याअंतर्गत प्रतिनिधींवर कृषी, अ‍ॅट्रॉसिटी, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रनिहाय अंतर्गत जबाबदारी निश्चित करण्यात येईल, हे प्रतिनिधी समितीचे पद लावणार नाही.

परिषदेतील ठराव
च्शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतीसाठी मोफत, अखंडित वीजपुरवठा करावा.
च्सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे आयात-निर्यात धोरण राबवावे.
च्शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.
च्मराठा समाजातील उद्योजक बनविण्यासाठी जिल्हानिहाय सध्याच्या मराठा उद्योजकांनी गटाची स्थापना व्हावी.
च्उद्योग हा विषय घेऊन पुन्हा एक परिषद घेऊन नवउद्योजकांना प्रशिक्षण द्यावे.
च्सरकारी सोयीचा उपयोग करून कौशल्य विकास कार्यक्रमाला चालना देऊन त्याची केंद्रे सुरू व्हावीत.
च्अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी त्यात सुधारणा करावी.
च्‘सकल मराठा समाज’, ‘मराठा क्रांती’ या नावाने कोणीही व्यक्ती अथवा संघटनांनी वैयक्तिक कार्यक्रम राबवू नये.
च्सीमाबांधवांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज उभा आहे.
च्छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा पुण्यातील संभाजी महाराज उद्यानामध्ये उभा करावा.
च्मराठा क्रांती मोर्चाद्वारे अंतिमरित्या सरकारकडे करण्यात आलेल्या सर्व मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही करावी.
च्मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी राज्य सरकारने योग्य ती सर्व कार्यवाही पूर्ण करून कायदेशीर घटनात्मकदृष्ट्या वैध असे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत.
च्मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय समन्वय समिती तयार करणे. त्यासाठी आचारसंहिता तयार केली जाईल. पुढील कार्यवाही ती समिती करेल.
च्मराठा समाजातील महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे.
च्रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केल्याच्या घटनेचा जाहीर निषेध.
च्दि. १० मे आणि ३० मे रोजी कोणताही मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाने जाहीर केलेला नाही. पुढील मोर्चा किंवा कृतीची घोषणा समन्वय समिती करेल.


परिषदेतील सूर
आता आपली
लढाई सुरू
आरक्षण हा आता लाभाचा विषय राहिला नाही, तर तो अस्मितेचा बनला आहे. सरकारने मागील दोन वर्षांत काही केले नाही. मात्र, आंदोलनाचा आणि क्रांती मूक मोर्चाच्या धास्तीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याचे बाळासाहेब सराटे यांनी सांगितले. ते म्हणाले, आरक्षणाबद्दल सर्वांत मोठी उपलब्धी काय असेल तर प्रतिज्ञापत्र राज्य शासनाच्या सहीने न्यायालयात सादर केले आहे. आता आपली लढाई सुरू झाली आहे. हे प्रतिज्ञापत्र आयोगासमोर जाऊ द्या, त्याला तपासणी करू द्या. मग न्यायालयात मराठा समाज पात्र असल्याचे आपण दाखवून देऊ. आपण तयारी केली आहे. पुरावे तयार केले आहेत. राज्यातील शैक्षणिक आरक्षण हे बेकायदेशीर आहे, त्याचे कुठलेही कायदेशीर डॉक्युमेंटेशन नाही. शासनाकडे तसे कोणतीही नोंद नाही. या आरक्षणाविरोधात आवाज उठविला पाहिजे.
कर्नाटकातील मराठा बांधवांचा सहभाग
या परिषदेत कर्नाटकातील बेळगाव येथून नेताजी जाधव, विलास बेळगावकर, एस. एम. बेळवडकर, सुनील जाधव, गुणवंत पाटील, आदी मराठा बांधव सहभागी झाले होते. सीमाबांधवांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज उभा राहण्याचा ठराव परिषदेत झाल्यानंतर त्यांनी उभे राहून ‘एक मराठा लाख मराठा’ अशी जोरदार घोषणाबाजी केली.
राज्यभरातील प्रतिनिधींची उपस्थिती
नामदेव कदम (रायगड), एम. एम. तांबे, एस. बी. पठारे (अहमदनगर), न. शा. जाधव (सोलापूर), महेश धुळप (कराड), अंकुश कदम (मुंबई), केदार कदम, धनंजय जाधव (पुणे), बालाजी मेढे (अंबेजोगाई), डॉ. राजाभाऊ करपे (औरंगाबाद), विनोद शिंदे (सातारा), विवेक पाटील (कराड), प्रकाश चौगुले (पिंपरी), योगेश सूर्यवंशी (सांगली), आदींसह राज्यभरातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित होते.


परिषदेतील ठराव
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतीसाठी मोफत, अखंडित वीजपुरवठा करावा.
सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे आयात-निर्यात धोरण राबवावे.
शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.
मराठा समाजातील उद्योजक बनविण्यासाठी जिल्हानिहाय सध्याच्या मराठा उद्योजकांनी गटाची स्थापना व्हावी.
उद्योग हा विषय घेऊन पुन्हा एक परिषद घेऊन नवउद्योजकांना प्रशिक्षण द्यावे.
सरकारी सोयीचा उपयोग करून कौशल्य विकास कार्यक्रमाला चालना देऊन त्याची केंद्रे सुरू व्हावीत.
अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी त्यात सुधारणा करावी.
‘सकल मराठा समाज’, ‘मराठा क्रांती’ या नावाने कोणीही व्यक्ती अथवा संघटनांनी वैयक्तिक कार्यक्रम राबवू नये.
सीमाबांधवांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज उभा आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा पुण्यातील संभाजी महाराज उद्यानामध्ये उभा करावा.
मराठा क्रांती मोर्चाद्वारे अंतिमरित्या सरकारकडे करण्यात आलेल्या सर्व मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही करावी.
मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी राज्य सरकारने योग्य ती सर्व कार्यवाही पूर्ण करून कायदेशीर घटनात्मकदृष्ट्या वैध असे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत.
मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय समन्वय समिती तयार करणे. त्यासाठी आचारसंहिता तयार केली जाईल. पुढील कार्यवाही ती समिती करेल.
मराठा समाजातील महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे.
रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केल्याच्या घटनेचा जाहीर निषेध.
दि. १० मे आणि ३० मे रोजी कोणताही मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाने जाहीर केलेला नाही. पुढील मोर्चा किंवा कृतीची घोषणा समन्वय समिती करेल.
 

Web Title: Vajramudha of the Maratha community is strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.