व्हॅलेंटाईन डे ? छे..छे..रस्त्यावरच्या वंचितांसाठी ‘रोटी डे’ - गुड न्यूज

By admin | Published: February 11, 2017 11:48 PM2017-02-11T23:48:32+5:302017-02-11T23:48:32+5:30

अखंड वाहू देत माणुसकीचा झरा : कऱ्हाडच्या तीन तरुणींनी साजरा केला अनोखा दिवस; गोरगरीब मनोरुग्ण, उपेक्षितांना दिले जेवण

Valentine's Day? Chh..... 'Roti De' for good reason. Good news | व्हॅलेंटाईन डे ? छे..छे..रस्त्यावरच्या वंचितांसाठी ‘रोटी डे’ - गुड न्यूज

व्हॅलेंटाईन डे ? छे..छे..रस्त्यावरच्या वंचितांसाठी ‘रोटी डे’ - गुड न्यूज

Next

संजय पाटील ---कऱ्हाड  -फेब्रुवारी हा ‘स्पेशल डे’चा महिना. या महिन्यात नाती वृद्धिंगत करण्यासाठी वेगवेगळ्या दिवसांचं वेगवेगळं महत्त्व ठरवलं गेलंय; पण याच ‘स्पेशल डे’च्या निमित्तानं माणुसकीचं नातं आणखी बळकट करणारा एक दिवस कऱ्हाडच्या तरुणाईनं साजरा केला. या खास दिवसाला त्यांनी नाव दिलं ‘रोटी डे’.
माणसांच्या गर्दीत काही ठिकाणी अपेक्षांच्या नजरा कायम भिरभिरत असतात. गर्दीतून वाट काढत हात पसरून या नजरा मदतीची याचना करतात. काहीजण या हातांवर पैसे टेकवतात. मात्र, अनेकवेळा असे हात दुर्लक्षित केले जातात. ‘भिकारी’ म्हणून त्यांना बाजूला सारलं जातं. हेटाळणी केली जाते. आणि कधीकधी अपमानास्पद वागणूकही मिळते. कऱ्हाडच्या काही तरुणींनी मात्र या वंचितांचं दु:ख जाणलं. फक्त एक दिवस का होईना या वंचितांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचा त्यांनी विचार केला. आणि हा विचार त्यांनी कृतीतही उतरविला. तेजस्विनी शहा ही कऱ्हाडातील उच्चशिक्षित तरुणी. काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘स्पेशल डे’च्या व्हायरल होत असलेल्या पोस्ट तेजस्विनीने पाहिल्या. या खास दिवसात एक वेगळा उपक्रम राबविण्याचा तिने विचार केला. तिने ही बाब मैत्रिणींना सांगितली. त्यांनीही त्याला प्रतिसाद दिला. मात्र, करायचं काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. फळवाटप, खाऊवाटप याहीपेक्षा वंचितांना आपुलकी वाटेल, असा उपक्रम राबविण्याचा विचार करीत असतानाच तेजस्विनीने ‘रोटी डे’ साजरा करण्याचे ठरविले. या दिवसाची रूपरेषा या मैत्रिणींनी तयार केली. ‘रोटी डे’च्या ठरलेल्या दिवशी तेजस्विनी शहा, उमा डुबल, शुभांगी पाटील या तीन तरुणी सकाळीच घराबाहेर पडल्या. घरातून निघताना त्यांनी घरातच बनविलेली रोटी व भाजी घेतली. तसेच पाण्याच्या बाटल्याही सोबत घेतल्या. शहरातील कोल्हापूर नाका, दत्त चौक, बसस्थानक, कृष्णा नाका, मुख्य बाजारपेठ मार्गावर या तरुणी फिरत राहिल्या. ज्याठिकाणी रस्त्याकडेला वंचित किंवा मनोरुग्ण दिसेल त्याठिकाणी थांबून या तिघी त्यांना सोबत आणलेल्या प्लेटमध्ये जेवण वाढत होत्या. एवढेच नव्हे तर त्यांचं जेवण पूर्ण होईपर्यंत त्या त्याचठिकाणी थांबायच्या. कऱ्हाडातील तरुणींनी साजरा केलेला हा ‘रोटी डे’ सध्या कौतुकाचा विषय ठरलाय.



मूकबधिर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
‘रोटी डे’ साजरा करण्याबरोबरच या तरुणींनी मूकबधिर मुलांना झटपट खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले. संबंधित मुलांना गॅसचा वापर करता येत नाही. तसेच गॅसचा वापर त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे गरज पडली तर आपली भूक कशी भागवता येईल, याची माहिती या तरुणींनी मुलांना दिली. तसेच सॅण्डविच बनविण्याचे प्रशिक्षणही त्यांच्याकडून मुलांना देण्यात आले.
‘व्हॅलेंटाईन डे’, ‘रोज डे’, ‘प्रपोज डे’ यासारखे खास दिवस साजरे करण्यापेक्षा उपेक्षितांसाठी काहीतरी करावं, या विचारातून आम्ही ‘रोटी डे’ साजरा केला. ज्यावेळी आम्ही अशा उपेक्षितांना भेटलो, त्यांना जेवण दिलं त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आम्हाला अद्वितीय आनंद देणारं होतं. आम्ही एक दिवसं साजरा केला. मात्र, हा एक दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात जास्त समाधनाचा दिवस ठरला.
- तेजस्विनी शहा, कऱ्हाड

कऱ्हाड येथे तरुणींनी उपेक्षितांसमवेत ‘रोटी डे’ साजरा केला.

Web Title: Valentine's Day? Chh..... 'Roti De' for good reason. Good news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.