वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 19:05 IST2024-12-31T19:04:10+5:302024-12-31T19:05:44+5:30

आरोपी पुण्यासारख्या शहरात येऊन आत्मसमर्पण करतो, मात्र त्याआधी त्याच्यापर्यंत आपली तपास यंत्रणा पोहचू न शकल्याने विरोधी पक्षातून टीका होत आहे.

Valmik Karad surrender The reaction from Uddhav Thackeray shiv sena milind narvekar | वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या!

वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या!

Walmik Karad: बीड जिल्ह्यातील पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी वाल्मीक कराड याने आज सीआयडीच्या पुणे कार्यालयात आत्मसमर्पण केले. मागच्या २२ दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मीक कराडला बेड्या ठोकण्यात अपयश आलेल्या पोलीस प्रशासनावर टीका होत आहे. महाराष्ट्राभर ज्या हत्या प्रकरणामुळे संताप व्यक्त केला जात होता त्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी पुण्यासारख्या शहरात येऊन आत्मसमर्पण करतो, मात्र त्याआधी त्याच्यापर्यंत आपली तपास यंत्रणा पोहचू न शकल्याने विरोधी पक्षातून टीका होत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मात्र कराड हा शरण येताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे की, "मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. याबद्दल  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाजी यांचे अभिनंदन," अशी पोस्ट नार्वेकर यांनी सोशल मीडियावर केली आहे.

काँग्रेसने काय आरोप केलाय?

वाल्मिक कराड याच्या आत्मसमर्पणावरून काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केले? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केला आहे. "खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलीस-सीआयडी वाल्मीक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही! इतके दिवस वाल्मीक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे. महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष  बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का?" असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
 

Web Title: Valmik Karad surrender The reaction from Uddhav Thackeray shiv sena milind narvekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.