जलयुक्त शिवारसाठी व्हॅल्युएबल ग्रुपची २१ लाखांची मदत
By admin | Published: August 28, 2015 01:26 AM2015-08-28T01:26:39+5:302015-08-28T01:26:39+5:30
राज्यातील दुष्काळ निवारणासाठी दीर्घकालीन उपाययोजना म्हणून राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाकरिता ‘व्हॅल्युएबल ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक
मुंबई : राज्यातील दुष्काळ निवारणासाठी दीर्घकालीन उपाययोजना म्हणून राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाकरिता ‘व्हॅल्युएबल ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक संजय गायकवाड यांनी २१ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
माध्यम, मनोरंजन, आदरातिथ्य आणि शिक्षण या क्षेत्रांमधील सामाजिक आणि व्यावसायिक अॅप्लीकेशन्समध्ये वापरण्यात येणाऱ्या सुविधांची तब्बल ३५ पेटंट आपल्या नावावर असलेल्या ‘व्हॅल्युएबल ग्रुप’चे गायकवाड यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नाविन्यपूर्ण क्षेत्रात केलेल्या कामगिरीकरिता अलीकडेच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हेच औचित्य साधत गायकवाड यांनी २१ लाख रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्राने मला भरभरून दिले. जलयुक्त शिवार योजनेत माझ्याकडून खारीचा वाटा म्हणून सरकारच्या योजनेला मदत करू शकलो याचे मला समाधान आहे. (प्रतिनिधी)