वंचितने ऐनवेळी उमेदवार बदलला, त्याचाच अर्ज बाद ठरला; प्रकाश आंबेडकरांना मोठा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 02:46 PM2024-04-05T14:46:10+5:302024-04-05T14:52:38+5:30
VBA Abhijeet Rathod Application Cancelled: वंचितने आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार बदलले आहेत. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. वंचितने आतापर्यंत १९ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत.
वंचितने आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार बदलले आहेत. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. वंचितने आतापर्यंत १९ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सुभाष खेमसिंग पवार या उमेदवाराला बदलून अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. यामुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे.
आज अर्ज छाननीला सुरुवात झाली होती. यावेळी राठोड यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या होत्या. यामुळे राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची ४ एप्रिल ही अखेरची तारीख होती. त्याच्या काही दिवस आधीच वंचितने अचानकपणे उमेदवारी बदलून राठोड यांना दिली होती. यामुळे राठोड यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
या मतदारसंघातून काल सायंकाळपर्यंत ३८ उमेदवारांवी ४९ अर्ज दाखल केले होते. आज या अर्जांची छाननी सुरु झाली आहे. महायुतीतून राजश्री पाटील तर महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितने उमेदवार दिल्याने या ठिकाणी चुरशीची आणि तिरंगी लढत पहायला मिळेल अशी चर्चा होती. परंतु आता वंचितला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारच बाद झाल्याने वंचितचे या मतदारसंघातील आव्हान संपुष्टात आले आहे. यामुळे वंचित आता कोणाला पाठिंबा देते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
तीन उमेदवार बदललेले...
रामटेकच्या उमेदवाराने तांत्रिक कारण सांगत माघार घेत काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात अभिजित राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर परभणीतून प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी दिली होती. परंतु उगलेंची उमेदवारी बदलून वंचितने हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली आहे.