Vidhan Sabha 2019 : आमचं दार एमआयएमसाठी अजूनही खुलं: प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 03:59 PM2019-09-18T15:59:56+5:302019-09-18T16:00:54+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : जागा वाटपाबाबत एमआयएम समाधानी नसल्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते.
मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं एमआयएमने जाहीर केलं होत. त्यांनतर आता यावर प्रकाश आंबेडकर यांनी मोठा खुलासा केला आहे. एमआयएमला 8 जागांचा प्रस्ताव दिलाच नसल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. मात्र एमआयएमसाठी अजूनही आमचे दार खुले असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले.
जागा वाटपाबाबत एमआयएम समाधानी नसल्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते. त्यानंतर जलील यांची भूमिकाच पक्षाची भूमिका असल्याची घोषणा एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली होती. विशेष म्हणजे वंचितकडून फक्त 8 जागा दिल्या जात असल्याचा दावा सुद्धा जलील यांनी केला होता.
मात्र यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने एमआयएमला 8 जागांचा प्रस्ताव दिलाच नव्हता. त्यांच्यासोबत युतीबाबत चर्चा सुरुचं असताना त्यांनी अचानक युती होणार नसल्याचे जाहीर केले. वंचित सोबत न येण्याच्या निर्णय त्यांचा आहे. मात्र आमचं दार त्यांच्यासाठी अजूनही खुले असल्याचे आंबेकर म्हणाले.
तर वंचित आघाडीसोबत जाण्यावर असदुद्दीन ओवेसी यांनी जागांबाबत तडजोड करण्यास तयारी दर्शवली असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपावर तोडगा काढला, तर पुन्हा नव्याने सुरूवात करण्याची आमची इच्छा असल्याचे जलील सुद्धा म्हणाले आहे. त्यातच आता आंबेडकर यांनी सुद्धा आमचे दारे एमआयएमसाठी मोकळी असल्याचे जाहीर केले आहेत. त्यामुळे पुन्हा वंचित आणि एमआयएम विधानसभेत एकत्र निवडणुका लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.