वंचित बहुजन आघाडी आणि मविआ युती फिस्कटली?; संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 10:45 AM2024-03-21T10:45:42+5:302024-03-21T10:46:26+5:30
अघोरी शक्ती, धनशक्ती यावर राहुल गांधी बोलले. दैवीशक्ती नाही. वारंवार मोदींना रडायची सवय आहे ते बंद करावे असंही राऊतांनी म्हटलं.
मुंबई - Sanjay Raut on Prakash Ambedrkar ( Marathi News ) वंचित बहुजन आघाडीचेप्रकाश आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत. त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. आम्ही त्यांना ४ जागांवर लढावे हा प्रस्ताव दिला. परंतु त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसतेय. तो प्रस्ताव मान्य केला असता तर नक्की आम्हाला आनंद झाला असता असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीवर भाष्य केले आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, हुकुमशाही विरोधातील लढ्याला संविधान वाचवण्याच्या लढाईला बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासोबत असण्यानं गती आणि बळ मिळालं असते. पण आम्हाला अजूनही खात्री आहे. सगळे प्रमुख नेते एकत्रित बसतील आणि ते पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. त्यांच्या मनात जर काही नाराजी, अस्वस्थता असेल तर ती दूर करण्यात आम्हाला यश येईल. या लढाईत महाराष्ट्रातील दलित, शोषित वंचित समाज आमच्यासोबत असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे असं त्यांनी सांगितले.
तर सांगलीच्या जागेवर आम्ही ठाम आहोत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरची जागा महाविकास आघाडीत ऐक्य राहावे यासाठी दिली आहे. तिथे विद्यमान खासदार शिवसेनेचा आहे. हातकणंगलेच्या जागेवर आमची राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एखादी जागा आमच्याकडे असावी आणि ती आम्ही ताकदीने लढावी. ही आमची भूमिका असेल तर त्यात काही चुकीचे असेल वाटत नाही असं सांगत राऊतांनी पुन्हा सांगलीच्या जागेवर दावा सांगितला.
दरम्यान, आमचं भाषण पंतप्रधान ऐकतात, २-४ वाक्य ऐकतात आणि त्यावर पुढची रणनीती बनवतात. राहुल गांधींनी शिवाजी पार्कवर भाषण केले त्यात एक शक्ती मोदींच्या मागे आहे असं बोलले, त्यावर मोदी रडायला लागले. अघोरी शक्ती, धनशक्ती यावर राहुल गांधी बोलले. दैवीशक्ती नाही. वारंवार मोदींना रडायची सवय आहे ते बंद करावे. देशाचे पंतप्रधान आहेत असा टोलाही राऊतांनी पंतप्रधानांना लगावला.
आम्ही औरंगजेबावर बोललो, मोदी कुठून आले?
जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचा जन्म झाला तिथे आमची सभा होती. महाराष्ट्रावर काही लोक दिल्ली, गुजरातहून आक्रमण करतायेत. परंतु ज्याप्रकारे महाराष्ट्राने ज्याप्रकारे औरंगजेबाचे आक्रमण संपवले, त्याची कबर महाराष्ट्रात खोदली. त्यामुळे याठिकाणी औरंगजेबाची वागणूक चालणार नाही. यात मोदीजी कुठे आहे. आमची देशभक्ती, राष्ट्रवादाची डिक्सनरी आहे. त्यांचा स्वार्थाची डिक्सनरी आहे. पंतप्रधानपदाची गरिमा ठेवावी अशी टीका राऊतांनी मोदींवर केली.