औरंगाबादमधील एकमेव मनसेच्या जिल्हा परिषद सदस्याला वंचितची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:46 PM2019-09-30T17:46:26+5:302019-09-30T17:54:05+5:30
विजय चव्हाण हे बिडकीन गटातून जिल्हा परिषद सदस्य आहेत.
मुंबई - पहिल्याच यादीमध्ये 22 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने दुसरी यादी जाहीर केली असून एकूण 180 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात औरंगाबादमधील पैठण मतदारसंघातून मनसेचे जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आधीच मनसेला जिल्ह्यात मरगळ आली असताना आता एकमेव जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण हे सुद्धा मनसेला राम-राम ठोकत वंचितकडून रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. विजय चव्हाण हे बिडकीन गटातून जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर गेल्यावेळी त्यांच्या पत्नी ह्या मनसेकडून याच गटातून जिल्हा परिषदेत निवडून येत,बांधकाम सभापती होत्या.
तर चव्हाण यांच्याकडे मनसेने जिल्हा अध्यक्ष पदाची सुद्धा जवाबदारी दिली होती. मात्र त्यांच्या वंचितच्या उमेदवारीमुळे मनसेला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित कडून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यांना अधिकृत उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.