Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंसमोरच प्रकाश आंबेडकरांनी दिले शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले, “या लढ्याकडे...”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 03:21 PM2023-01-23T15:21:47+5:302023-01-23T15:24:20+5:30
Maharashtra News: शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानाला प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले.
Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा अखेर करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर करण्यात आली. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, मी या भानगडीत पडत नाही, असे म्हटले होते. यावर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे समोर असताना शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली. ही प्रतिक्रिया नवीन नाही. आमच्या दोघांचे भांडण फार जुने आहे. हे शेतातील भांडण नाही, नेतृत्वातील भांडण आहे, दिशेचे भांडण आहे. ते आमच्याबरोबर येतील अशी आशा बाळगतो. कारण या लढ्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही
प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. एक दिवस प्रत्येकाचा अंत होणार आहे. तसाच एक दिवस नरेंद्र मोदींचाही अंत होणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच एखाद्या नेत्याने खरेच पैसे खाल्ले असेल तर त्याच्यावर जरूर कारवाई करा आणि न्यायालयात नेऊन तुरुंगात टाका. मात्र, न्यायालयात न्यायचे नाही, तुरुंगात टाकायचे नाही, केवळ नेतृत्वाचे प्रतिमाहनन करायचे. आताच्या घडीला दुर्दैवाने ईडीच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रकार सुरू आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
दरम्यान, नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले आणि चंद्रशेखर गेले तेव्हा मी खासदार झालो. आम्ही पहिला आवाज तेव्हाचे टेलिकॉम मंत्री यांच्याविरोधात उठवला. १५ दिवसांनी सभागृह बंद केले. नरसिंहराव आणि आमचे चांगले संबंध होते. त्यांनी महिनाभरानंतर बोलावून घेतले आणि विचारले की, तुम्ही काय केले? त्यावर आम्ही सभागृह बंद केले, त्यानंतर तुम्ही पुढे काय केले असे सांगण्याची मागणी केली. नरसिंहरावांनी आम्हाला पुन्हा बोलावून सांगितले की, तुम्ही असेच केले तर देशातील राजकीय नेतृत्व संपेल. सध्या राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रकार देशात सुरू आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"